‘मेक इन इंडिया’चे अनुकरण रशियाने करण्याची गरज – व्लादिमीर पुतीन
13 Sep 2023 21:03:35
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेचे पुन्हा एकदा मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्लादिवोस्तोक येथील 8 व्या पूर्व आर्थिक मंचाला संबोधित केले. यावेळी रशियन प्रसारमाध्यमांना संबोधित करताना त्यांनी भारताच्या धोरणांचे कौतुक केले. ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी 'योग्य गोष्ट' करत आहेत. देशांतर्गत उत्पादित मोटारगाड्या वापरल्या गेल्या पाहिजेत आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या धोरणांद्वारे आधीच तसा आदर्श ठेवला आहे. रशियाने आपल्या अनेक भागीदारांचे अनुकरण केले पाहिजे. पंतप्रधान मोदी हे भारतवासियांना भारतात बनवलेल्या वाहनांचे उत्पादन आणि वापर करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श रशियानेही घेण्याचे गरज असल्याचे पुतीन म्हणाले.
भारत - प.आशिया – पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (आयएमईसी) रशियासाठी अडथळा ठरू शकेल असे काहीही दिसत नसल्याचेही पुतीन यांनी सांगितले. या प्रकल्पाचा रशियासदेखील लाभच होणार आहे. या प्रकल्पामुळे रशियामध्येदेखील लॉजिस्टिक क्षेत्रास बळकटी प्रदान करणारा ठरणार असून त्याची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.