मुंबई : भाजप नेते मोहित भारतीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार नवाब मलिक यांच्यात रंगलेला वाद अद्याप सुरूच आहे. भारतीय यांनी मलिकांवर केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्याची मंगळवारी सुनावणी झाली. त्यात मलिकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मोहित भारतीय यांची बदनामी केल्याप्रकरणी मलिक यांच्यावर शिवडी न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे.
मंगळवारी शिवडी न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी माजी मंत्री नवाब मलिक हे स्वतः हजर होते. यावेळी झालेल्या सुनावणीत मलिकांना दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
सदरील प्रकरणात मलिकांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. २०२१ मध्ये मोहित भारतीय यांनी तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी आपली बदनामी केल्याचा दावा करीत अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत मलिकांना जामीन देत या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.