नवी दिल्ली : काशी आणि अयोध्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार मथुरेला नवसंजीवनी देण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची मथुरामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून भव्य कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे. ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या बैठकीत आता मथुरेतही भव्य कॉरिडॉर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री योगी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, सुधारणा झाल्यानंतर ही संपूर्ण योजना लवकरच अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे.
त्यानंतर कोर्टाची मंजुरी मिळाल्यानंतर या वर्षी कॉरिडॉरचे काम सुरू करण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी गर्दीत चिरडून दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, एका याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला कॉरिडॉर बांधण्याची योजना सादर करण्यास सांगितले होते, ज्याची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात होणार आहे.
२२८०० चौरस मीटरमध्ये कॉरिडॉर प्रस्तावित
मथुरामध्ये बांधण्यात येणारा हा कॉरिडॉर एकूण २२८०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात बांधला जाईल, ज्यामुळे लोकांना बांके बिहारी येथे जाण्यासाठी कमी वेळ लागेल. लोकांची गर्दी व्यवस्थापनातही सोय होणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, एकावेळी फक्त ८०० भाविक बांकेबिहारीला भेट देऊ शकत आहेत, तर कॉरिडॉर तयार झाल्यानंतर त्याची क्षमता ५००० च्या पुढे जाणार आहे.
मथुरा कॉरिडॉर या वैशिष्ट्ये
- गंगा नदीला जोडणाऱ्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर हा कॉरिडॉर मंदिराला यमुना नदीशी जोडेल.
- यमुना नदीत स्नान करून भाविकांना थेट बांकेबिहारीचे दर्शन घेता येणार आहे.
- मंदिराभोवती ९ मीटरचा बफर झोन तयार केला जाईल, ज्यात हरित पट्टा असेल.
- परिक्रमा मार्ग ते मंदिर रस्त्यापर्यंत ७५० चौरस मीटरमध्ये रुंद रस्ता तयार करण्यात येणार आहे, तर १८,४०० चौरस मीटर मोकळा क्षेत्रही असणार आहे.
- मंदिरासमोरील दुमजली संकुलात प्रतीक्षालय बांधण्यात येणार आहे.
- पूजा साहित्याची दुकाने, वैद्यकीय आणि पोलिस सुविधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
- या कॉरिडॉरमध्ये, भाविक बांके बिहारी मंदिर तसेच मदन मोहन मंदिर आणि राधावल्लभ यासारख्या प्राचीन मंदिरांचा समावेश असलेल्या आणखी चार प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकतील.