'तो' व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने फिरवणं खोडसाळपणा: एकनाथ शिंदे

    13-Sep-2023
Total Views |
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. त्यामुळे जे काही विघ्नसंतोषी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने फिरवणं हा खोडसाळपणा असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
 
आरक्षणाच्या मुद्दयावर बोलताना शिंदे पुढे म्हणाले, "आंदोलन आणि आरक्षण याबाबत सरकार गंभीर आहे. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेला येत असताना आम्ही बोलत बोलत येत होतो. प्रॅक्टिकल चर्चा झाली होती. रात्रभर चर्चा झाली होती. तिघांनी ठरवलं होतं की, उपोषणावर बोलू त्या व्यतरिक्त राजकीय काहीही वक्तव्य करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण, काहींनी व्हिडिओचा भाग कट करुन सादर केला."
 
"मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय कोणतीही राजकीय विषयाची चर्चा नको असं आम्ही ठरवलं होतं. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा अर्थ काढून आणि चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सादर करण्यात आला. नेमका काही भाग काढून संभ्रम निर्माण होईल असा व्हिडिओ समोर आणला. सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाही हे दाखवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत."
 
"राज्यात काही विघ्नसंतोषी लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळालं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. हायकोर्टानेही ते मान्य केलं होतं. पण, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. कोणाचं अपयश हे मी आता बोलणार नाही. मराठा आरक्षण मिळालं अशी आमची भूमिका आहे. तज्ज्ञ लोकांशी याबाबत चर्चा केली आहे."असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.