‘आकाश’कडून पाताळाकडे...

    13-Sep-2023
Total Views |
Edtech company Byju's plans asset sale to pay off $1.2 billion loan

‘बायजू’ ही ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑफलाईन कोचिंग कंपनी ‘आकाश’ला खरेदी करून खासगी शिक्षण क्षेत्रातच मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण, आज २२ अब्ज शिखरावरून ‘बायजू’चे बाजारमूल्य पाच अब्ज डॉलर्सवर आले आहे. त्यामुळे ‘बायजू’ची ही ‘आकाश’कडून पाताळाकडे झालेली वाटचाल समजून घेणे गरजेचे आहे.

र्टअप’च्या उभारणीत आज भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात आजघडीला एक लाखांपेक्षा जास्त ‘स्टार्टअप’ आहेत. यासोबतच भारतातील १०८ ‘स्टार्टअप्स’ना ‘युनिकॉर्न’चा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणजेच या १०८ ‘स्टार्टअप्स’चे बाजारमूल्य कमीत कमी एक अब्ज डॉलर्स इतके! या १०८ ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’मध्ये बायजू रवींद्रन यांचे ‘बायजू’ हे ऑनलाईन शिक्षण देणारे ‘स्टार्टअप’सुद्धा सामील. दोन वर्षांपूर्वी २२ अब्ज डॉलर्स बाजारमूल्यांसह ‘बायजू’ भारतातील सर्वात मोठे ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ ठरले. पण, मागच्या काही महिन्यांपासून ‘बायजू’चे ग्रह फिरले आहेत. २२ अब्जांच्या शिखरावरून ‘बायजू’चे बाजारमूल्य आज पाच अब्ज डॉलर्सवर आले आहे. त्यामुळे ‘बायजू’ची ही घसरगुंडी समजून घेण्याची गरज आहे.

आज संपूर्ण जग आभासी दुनियेत जगत असून त्यात ऑनलाईन कोचिंग क्लासेसचीही भर पडलेली दिसते. आजघडीला भारतात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी ऑनलाईन क्लासेसची सेवा घेतली जाते. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस देणारे अ‍ॅप आधारित ‘स्टार्टअप्स’देखील बाजारात आले. २०२२ मधील आकडेवारीनुसार, भारतात ऑनलाईन शिक्षणाचे बाजारमूल्य चार अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. यात कोरोनाने आणखीच भर टाकली. कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर लोकांनी भर दिला. त्यामुळे या क्षेत्रानेही भरारी घेतली.

कोरोना काळाचा सर्वाधिक फायदा मिळाला तो, ’बायजू’ला. ‘बायजू’ची ऑनलाईन क्लासेसची सेवा घेणार्‍यांची संख्या कोरोना काळात एकाएकी वाढली. ही मागणी अशीच राहील, असा अंदाज बांधून ’बायजू’ने कोरोना काळात ‘ब्लाकरॉक’, ‘सिल्व्हर लेक’ यांसारख्या दिग्गज गुंतवणूकदार कंपन्यांकडून ५० हजार कोटींची गुंतवणूकही पदरात पाडून घेतली आणि नंतर याच पैशातून ‘बायजू’ने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे अधिग्रहण करायला सुरुवात केली.

’बायजू’ने ऑगस्ट २०२० मध्ये ६०० दशलक्ष डालर्समध्ये ’ग्रेट लर्निंग’ विकत घेतले. त्यानंतर ’बायजू’ने ५०० दशलक्ष डालर्स खर्च करून अमेरिकन कंपनी ’एपिक’ला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर ’बायजू’ने ३०० दशलक्ष डालर्सला ’व्हाईटहॅट ज्युनिअर’ला आणि १५० दशलक्ष डॉलर्स खर्च करून ’टॉपर’ला विकत घेतले. ’बायजू’ एवढ्यावरच थांबली नाही. यानंतर ’बायजू’ने भारतातील प्रसिद्ध ऑफलाईन कोचिंग कंपनी ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिस लिमिटेड’ला एक अब्ज डॉलर्स किमतीत खरेदी केले.

या सर्व अधिग्रहणामुळे भारतात ’बायजू’ची ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झाली. ’बायजू’ भारताच्या ‘स्टार्टअप इकोसिस्टम’चा चेहरा बनला. याच काळात ’बायजू’ने मार्केटिंगवर देखील पाण्यासारखा पैसा ओतला. भारतात शाहरूख खानला ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ बनवण्यात आले. ’बायजू’ भारतीय क्रिकेट संघाची शीर्षक प्रायोजक बनली. भारताच्या बाजारात चांगले काम करत असताना ’बायजू’ने परदेशातही आपले पाय रोवायला सुरुवात केली. यासाठी ‘बायजू’ने ‘फिफा विश्वचषका’चे सहप्रायोजकत्वदेखील मिळवले. मार्केटिंगसाठी शाहरुख कमी पडत होता की काय म्हणून आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून ‘बायजू’ने प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला करारबद्ध केले.

गुंतवणूकदारांकडून मिळणारा निधी आणि मार्केटिंगवरील प्रचंड खर्चाच्या जोरावर ’बायजू’ने भारतातील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. २०२२ मधील फंडिंग फेरीत ’बायजू’चे मूल्यांकन २२ अब्ज डॉलर्स इतके होते. पण, ’बायजू’ला ही चमक जास्त काळ टिकवता आली नाही. कर्ज आणि गुंतवणूकदारांच्या पैशावर मोठी झालेल्या ’बायजू’ला नफा कमवण्याचे गणित समजलेच नाही.

ताळेबंदात दाखवण्यासारखे काहीच नसल्यामुळे ’बायजू’ने २०२१ पासून आपल्या आर्थिक स्थितीचा तपशील जाहीरच केला नाही. ’बायजू’ने शेवटच्या आर्थिक तपशीलात साडेचार हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती गुंतवणूकदारांना दिली होती. कोरोना महामारी संपल्यानंतर ’बायजू’ची स्थिती आणखी वाईट झाली. कोरोनानंतर शाळा, कॉलेज, ऑफलाईन क्लासेस सुरू झाले. त्यामुळे ऑनलाईन शैक्षणिक उत्पादनांची मागणी कमी झाली. यामुळे ’बायजू’ आकाशातून रसातळाला यायला सुरुवात झाली. कोरोना काळातील विक्रीचा आकडा गाठण्यासाठी ’बायजू’ने मार्केटिंगवर प्रचंड भर दिला होता. ’बायजू’ पैसे गुंतवत राहिली आणि प्रत्येक फंडिंग फेरीत ’बायजू’ची किंमत वाढत गेली. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नव्हते. याउलट ’बायजू’ वाढत्या मूल्यांकनाचे ढोल पिटून गुंतवणूकदारांना पुढील गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होती. जोपर्यंत बाजार मूल्याचा हा फुगा वाढत होता; तोपर्यंत सर्वजण आनंदी होते. पण, आता हा फुगा पूर्णपणे फुटला आहे.

आज या कंपनीची अवस्था इतकी बिकट आहे की, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कंपनीला कर्ज घ्यावे लागत आहे. त्यातच कंपनीचे काही कर्जदार न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे कंपनीला आणखीनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. ’बायजू’चे प्रकरण कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मानकांशीही करण्यात आलेला खेळखंडोबा आहे. जर कंपनीने गुंतवणूकदारांकडून पैसे उभे केले, तर त्या पैशांचे ही कंपनी नेमके काय करीत आहे, याचे तपशील जाहीर करणे ही खरं तर नैतिक जबाबदारी. पण, आर्थिक वर्ष २०२१ नंतरचा ताळेबंद कंपनीने सादर केलेला नाही आणि आज ’बायजू’चे संस्थापक रवींद्रन हे गुंतवणूकदारांना कंपनीची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणली जाईल, असे आश्वासन देत आहेत.

परंतु, ’बायजू’ ज्या वेगाने घसरत आहे, ते लक्षात घेता, ’बायजू’ची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणे कठीणच. कारण, या कंपनीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत आणि अनेकांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या मुलांनी ’बायजू’चे ऑनलाईन अभ्यासक्रम स्वीकारले आहेत, त्यांनाही समस्या उद्भवू शकतात. एकूणच ’बायजू’च्या अपयशामुळे भारतातील इतर ‘स्टार्टअप्स’वरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात ‘बायजू’ आकाशभरारी घेते की आणखी खोल आर्थिक गर्तेत रुतते, हे पाहावे लागेल.

श्रेयश खरात

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.