मुंबई : सर्व्हीकल स्पॉन्डिलायटिस एक असा आजार आहे जो मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्या मध्ये बिघाड झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होत असतात आणि सर्वसाधारण जीवन जगताना अडचणी निर्माण होतात. हा आजार ५०-६० वयामध्ये निर्माण होतो कारण हाडांच्या घर्षणाची समस्या वयानुसार वाढत जाते. मात्र, या आजाराचे वाढते प्रमाण आता तरुणांमध्ये दिसुन येत आहे.
सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीस ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हिकल स्पाईनमध्ये उद्भवते. म्हणूनच याला सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीस म्हणतात. मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन तासंतास बसुन राहणे, चुकीच्या स्थितीत बसणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे, व्यायाम न करण्याची सवय आणि तणाव ही याची प्रमुख कारणे आहेत.
याची सुरुवात मानेच्या खाली वेदनेने होते. हळूहळू ही वेदना खांद्यांपर्यंत, पाठितून हातापर्यंत पोहोचते. बर्याच वेळा डोकेदुखी आणि चक्कर येणे आदि समस्या देखील सुरु होतात. आपल्याला या प्रकारची समस्या असल्यास, तज्ञांचा सल्ला घ्या. अन्यथा या आजाराचे गंभीर परिणाम उद्भवु शकतात.
सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीससाठी योगाभ्यास हा नैसर्गिक उपाय आहे. भुजंगासन, धनुरासन, मार्जरी आसन, सेतुबंधासन, मत्स्यासन उपयोगी ठरु शकतात. शिवाय, पाणी भरपूर प्या आणि कॅल्शियमयुक्त आहार घ्या. नियमित व्यायाम करा. सतत खाली वाकून कोणतेही काम करु नका. आवश्यकतेपेक्षा अधिक वजन उचलू नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.