मुंबई : गणेशोत्सव काळात गणेशमूर्तीवर शिक्के मारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. अखेर पालिका प्रशासनाकडून मंत्री लोढा यांच्या मागणीची दखल घेत सदर निर्णय रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दि. २८ जून रोजी विविध वृत्तपत्रांद्वारे प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील गणेश मूर्तीवर लाल किंवा हिरव्या रंगाची खूण नमूद करण्याची अट वगळण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गणेशोत्सव काळात गणेशमूर्तीवर शिक्के मारण्याच्या निर्णयामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, याकरिता हा निर्णय रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. या मागणीची पूर्तता करण्यात आली असून आता मुंबईकर आपला आवडता गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करू शकणार आहेत, असे मंत्री लोढा यांनी आपल्या 'X' पोस्टद्वारे म्हटले आहे.