नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या अर्थात हिंदूविरोधी समन्वय समितीच्या बैठकीत सनातन धर्मास संपविण्याच्या कारस्थानावर चर्चा करण्यात आली, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी लगाविला आहे.
काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी पार पडली. यावेळी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे आघाडीची पहिली जाहिर सभा घेण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लवकरच जागावाटपावर चर्चा सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
बैठकीपूर्वी सकाळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी इंडिया आघाडी ही हिंदूविरोधी समन्वय समिती असल्याची टिका केली. ते म्हणाले, सोनिया गांधी आल्यापासून संपूर्ण देशात हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. वास्तविक, त्यांचा हेतू हिंदू धर्माची हत्या करण्याचा आहे. काँग्रेसच्याच कार्यकाळात राम अस्तित्वात नसल्याते न्यायालयात सांगण्यात आले, तर राहुल गांधी यांनी हिंदू आणि इसिसमध्ये कोणताही फरक नसल्याचा दावा केला होता. मात्र, सोनिया गांधींनी कितीही प्रयत्न केले तरी हिंदू धर्मास संपविणे शक्य होणार नाही.
श्रीराम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर पात्रा म्हणाले की, ते म्हणतात की राम मंदिर बांधल्यानंतर जेव्हा हिंदू रेल्वेने जातात तेव्हा गोध्रासारखी घटना घडू शकते. यापेक्षा घृणास्पद वाक्य असू शकत नाही. त्यांनी आम आदमी पक्षावरही निशाणा साधत उद्धव यांच्या वक्तव्याचे समर्थन करत असल्याचे सांगितले. भाजपने समाजवादी पक्ष आणि आरजेडीवरही निशाणा साधला. समाजवादी पक्षाने राम मंदिर बांधू नये असे विधान केले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचा जनाधार अशा पक्षांच्या पाठीशी नसल्याचेही पात्रा यांनी यावेळी सांगितले.