‘दीप’राग व शरीर दाह

    13-Sep-2023
Total Views |
Article On King Vikramaditya Deepak Raga

’दीप’ रागाच्या गायनाने राजा विक्रमादित्याच्या अंगाचा विलक्षण तर नव्हेच; पण साधा दाहसुद्धा झाला नव्हता. तो दाह शांत करण्याकरिता त्याला कोणत्या राजकुमारीच्या मेघ रागाची आवश्यकता नव्हती. मियाँ तानसेनने ‘दीपक’ राग गायिला; पण त्यात त्याच्या देहाचा अतिशय दाह झाला. तो दाह त्याच्या कोण्या प्रेयसीने मेघ राग गाऊन पर्जन्याने शांत केला, असे म्हणतात. राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग गायनाने अंगाचा मुळीच दाह झाला नाही. लेखकाचाही असाच स्वतःचा थोडा अनुभव आहे. मग राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग कोणता? तो खरा की खोटा?

मियाँ तानसेनाचा ‘दीपक’ राग, तर आम्ही खोटा मानायला तयार नाही. कारण, तो शहेनशहा अकबर बादशहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. राग खोटा म्हणावा तर दोघांनीही दिवे लावून दाखविले होते. मग रागस्वर किंवा साधन प्रक्रिया किंवा शरीर शुद्धतेत काही फरक होता काय? साध्या तांब्याच्या तारेतून वीज चटकन निघून जाते; पण तीच वीज टंगस्टन धातूच्या तारेतून धाडली असल्यास विजेच्या प्रवाहाला गतिरोध होऊन त्यातून प्रखर उष्णता उत्पन्न होते आणि त्या प्रखर उष्णतानिरोधातून प्रकाश प्रकाशू लागतो. विजेचे बल्ब ही त्याच विद्युतप्रवाहाला विरोध झाल्याची फलनिष्पत्ती होय. असला प्रकार तर नसेल ना मियाँजीच्या गायन प्रकारात वा शरीररचनेत? काय खरे मानावे? राग खरा की, गायकाचे शरीर खोटे?

पिंडाची शुद्धी

योग्य विचार केल्यास असे आढळून येईल की, ‘दीपक’ राग गाण्याकरिता जसे दीपकाचे शुद्ध स्वर आवश्यक असतात. तद्वत तो राग गाणार्‍याचे शरीरही तेवढेच शुद्ध असावे लागते. राग अशुद्ध असल्यास दिवे लागणार नाहीत, तर शरीर अशुद्ध असल्यास त्या बळजबरीचा परिणाम शरीरावर होऊन गायकाच्या शरीरात अतिशय दाह उत्पन्न होईल. आज आमच्यापर्यंत प्रवाहित झालेला दीपक राग तीन प्रकारच्या तीन थाटांमधील आहे. पूर्वी, वेलावली व कल्याण हे ते तीन थाट होत. प्राचीन कालात ‘दीपक’ स्वरमेल होता आणि त्या ‘दीपक’ स्वरमेलातील रागरागिण्यांतील रागिणी म्हणजे कल्याणी होती. आजचा कल्याण मेल त्यातीलच असावा. म्हणजे दीपक राग किंवा थाटात तीव्र मध्यमाचे प्राबल्य असावे असे दिसते. त्याकाळचा खरा दीपक राग कोणता, यावरही बरेच संशोधन होणे आवश्यक आहे. तद्वत् असले विधायक राग गाण्यासाठी गायकाचे शरीरही साधनसंपन्न व शुद्ध असणे आवश्यक असते. तानसेनाची कथा खरी मानल्यास ‘दीपक’ राग गायिल्यामुळे तानसेनाच्या अभक्ष भक्षण केलेल्या भ्रष्ट शरीरात दाह उत्पन्न होणे साहजिक होते.

शुद्ध राग व शुद्ध शरीर यांचा सुंदर संगम झाल्यास घटनाप्राप्ती होऊन माध्यमाला म्हणजे गायकाला कोणताच त्रास होणार नाही, हे यावरून स्पष्ट होते. गायकाला वा साधकाला उत्तम संस्कार व शुद्ध शरीर दोन्ही आवश्यक आहेत. साधे लोह व लोहचुंबकत्व उत्पन्न केले गेलेले लोह यात वरून जरी सारखेपणा दिसत असला, तरी त्या दोन्ही लोहपट्ट्यांच्या अंतर्गत अणु रचनेतच मूलतः फरक झालेला असतो आणि म्हणून एक साधे लोह, तर दुसरे संस्काराने अणुरचना बदललेले लोहचुंबक बनत असते.

‘संस्कारात द्विज उच्चते’ तानसेनाचा दाह या शरीर अवरोधामुळे तर उत्पन्न झाला नसेल? यावरून ‘दीपक’ राग म्हणूनही शरीराचा दाह न होण्याकरिता आणखी कोणत्यातरी गोष्टीची आवश्यकता असली पाहिजे आणि ती म्हणजे पिंडाचे शुद्धत्व ही होय. आधीच आम्ही ‘दीपक’ रागाची शक्यता मानायला तयार नाही आणि त्यात आता पिंडशरीराच्या शुद्धतत्त्वाची भर पडली. पण, सत्याला लोकेषणेचा मोह नसतो. सत्य ते सत्यच, मग ते कोणाला आवडो वा न आवडो. चंद्रयात्रेवर जाणारे चंद्रयात्री कसेही वागले ते चालत नाही. त्यांना अवकाशात कसे वागावे, त्यानुरूप स्वतःच्या शरीराला कसे वळण लावावे, शरीर कसे शुद्ध राखावे इत्यादी गोष्टींचे सतत शिक्षण व सतत संस्कार घ्यावा लागतो. तेव्हा कोठे ते चंद्रावर पोहोचू शकतात.

कोणताही सोम्यागोम्या चंद्रावर पोहोचू शकत नाही. तीच कथा शास्त्रीय विधायकतेची असते. योगमार्गातील खर्जसाधनेने सारे शरीर शुद्ध होऊन साधक गायकाच्या मूलाधारातील कुंडलिनी जागृत होऊन तीच तिचा मार्ग सप्तस्वरांची स्थाने दाखवीत-दाखवीत चक्रभेदाने वर काढीत असते. हे न झाल्यास विद्युतशास्त्रातील रचनेप्रमाणे (earthing) किंवा शॉर्ट सर्किट होऊन मीटर जवळील फ्यूज वायर जशी आपोआप जळून उडून जाते व सर्व विद्युत लाईन बेकाम होऊन जाते. तद्वत असल्या शास्त्रीय विषयाला साजेसे गायकाचे शरीर नसल्यास, त्याच्या शरीराचा फ्यूज उडाल्यास आश्चर्य नाही. तानसेनाचा दाह असल्याच अवस्थेतील असावा.

स्वरोदयशास्त्र : चंद्रनाडी सूर्यनाडी

एखाद्या साधक गायकाने आपल्या शरीराची यथायोग्य प्रगती करून विधायक संगीताचे स्वर आळवल्यास कार्यभाग होईल काय? उत्तर आहे-‘अजून नाही.’ त्याकरिता आणखी एका शास्त्राची आवश्यकता आहे आणि ते शास्त्र म्हणजे स्वरोदय शास्त्र होय. हे स्वरोदय शास्त्र म्हणजे सरगम नसून, आपल्या उजव्या व डाव्या नाकपुडीतील वायुनाड्यांचे म्हणजे स्वरांचे ज्ञान शास्त्र होय. उजवी नाकपुडी चालू असल्यास सूर्यस्वर, डावी चालू असल्यास चंद्रस्वर आणि दोन्ही शून्य-शून्य असल्यास सुषुम्ना स्वर असतो. सुषुम्नेत कोणतेच कार्य घडत नसते. सुषुम्ना नाडी वैराग्य नाडी आहे. या नाडीतून मारुहसारखे वैराग्यदायक राग गावेत. सुषुम्ना समाधीपासून निर्वाणापर्यंतच्या अवस्थेत घेऊन जाते. देवांचा मध्यमग्राम याच सुषुम्नेतून साधायचा असतो.

डावी नाडी म्हणजे चंद्र नाडी. आपतत्वातील वस्तुलाभ व घटनाप्राप्ती ही नाडी स्थिर ठेवून करिता येते. उदाहरणार्थ, मेघमल्हार राग गाऊन पर्जन्य पाडायचे आहे. त्याकरिता ‘मेघमल्हार’ रागाचे साधन व त्यानुरूप शरीर इतकेच असून भागणार नाही, तर मेघमल्हाराचे शुद्ध स्वर गातांना गायकाला आपली चंद्र नाडी सतत स्थिर ठेवावी लागेल; तरच मेघमल्हार गायिल्यावर पर्जन्य पडेल, अन्यथा नाही. ‘दीपक’ राग गाऊन ज्योती पाजळायच्या असल्यास शुद्ध ‘दीपक’ राग व त्याला आवश्यक असे साधनशरीर जसे आवश्यक आहे, तद्वत ‘दीपक’ राग गाताना साधक गायकाला आपली सूर्यनाडी सतत स्थिर ठेवावी लागते. हे न झाल्यास अवकाशात ‘दीपक’ लागणार नाहीत.

स्वरोदयशास्त्रात स्पष्ट वचन आहे,
‘स्वरे वेदाश्च शास्त्राणि, स्वरे गांधर्वमुत्तमम्। स्वरे च सर्व त्रैलोक्यं स्वरमात्म स्वरुपकम् ॥१५॥ (शिवस्वरोदयः) आणखी दोन वचने आहेत.
‘नाद रुपादिकाः सर्वे मिथ्यासर्वेषविम्रमः ॥२५॥ इदं स्वरोदयं शास्त्रं, सर्वशास्त्रोत्तमोत्तमम्॥२६ ॥ (शिवस्वरोदय)

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.