तस्मै श्री वृषभाय नमः!

    13-Sep-2023
Total Views |
Article On Bail Pola Festival

कृषीला सुजलाम्-सुफलाम् करण्यात अत्यंत जवळचा घटक जर कोणता असेल, तर तो म्हणजे बैल! शेतीचे सर्वदृष्टीने संवर्धन करण्याकरिता आपले सर्वस्व समर्पित करणार्‍या या वृषभ देवाविषयी कृतज्ञता बाळगणे, हे आम्हां भूमिपुत्रांचे कर्तव्य नव्हे काय? यासाठीच तर बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आपल्या देशात रूढ झाली आहे.

शुनं कीनाशा अभियन्तु वाहै:।
(ऋग्वेद -४/५७/८)
......यजमानस्य पशुन् पाहि।
( यजुर्वेद-१/१)


अन्वयार्थ

(कीनाशा:) सर्व शेतकरी (वाहै:) बैलांच्या सोबत (अभि )त्यांच्या चारही बाजूंनी ( शुनं ) सुखपूर्वक (यन्तु) चालत राहोत. हे परमेश्वरा ! तू (यजमानस्य) यजमानाच्या (पशुन्) पशुंचे (पाहि ) रक्षण कर.

विवेचन

मानव हा सर्वदृष्टीने समाजशील प्राणी मानला जातो. पण, त्याची ही समाजशीलता केवळ मानवी समाजापुरतीच मर्यादित नसून, आपल्या परिसरातील पशुपक्ष्यांशीदेखील निगडित आहे. यासाठीच तर वेदांनी आपल्या समवेत राहणार्‍या प्राणीमात्रांशी मैत्रीचे नाते जोडण्याचा संदेश दिला आहे. एका मंत्रात म्हटले आहे-

मित्रस्य चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम्!
सर्वच जीवांशी आम्ही मित्रत्वाच्या नात्याने प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत आहोत. कधीही कोणाशी वैरभावना बाळगून हिंसक वृत्ती ठेवता कामा नये. कारण, आम्हा सर्वांचे जीवनच एक दुसर्‍यावर अवलंबून आहे.

मानवी जीवनात उपयुक्त ठरणारे प्राणी हे तर आपले सोबतीच! यामध्ये गायी, बैल, म्हशी, घोडे, कुत्रे व इतर प्राणी आपणांकरिता फायद्याचे ठरतात. अशा मुक्या प्राण्यांविषयी दया व सद्भावना ठेवत कृतज्ञता बाळगणे, हे माणसाचे कर्तव्य आहे. गाईला तर ‘गावो विश्वस्य मातर’ असे संबोधून तिला जगाच्या मातेचा गौरव प्रदान केला आहे. गाई सोबतच बैलाचेदेखील तितकेच महत्त्व आहे. जिथे गाय आम्हांस अमृतमय दुग्ध प्रदान करून शारीरिकदृष्ट्या बलवान व बौद्धिकदृष्ट्या तेजस्वी बनवते, तेथे बैल हेदेखील आपल्या कष्टपूर्ण जीवनाने या पावन भूमीतून सोने पिकवतात. रात्रंदिवस कष्ट करीत आपल्या पोषणकर्त्या बळीराजाला मोलाची साथ देतात.

शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय! म्हणूनच तर आपला देश कृषिप्रधान देश समजला जातो. पण, या कृषीला सुजलाम्-सुफलाम् करण्यात अत्यंत जवळचा घटक जर कोणता असेल, तर तो म्हणजे बैल! शेतीचे सर्वदृष्टीने संवर्धन करण्याकरिता आपले सर्वस्व समर्पित करणार्‍या या वृषभ देवाविषयी कृतज्ञता बाळगणे, हे आम्हां भूमिपुत्रांचे कर्तव्य नव्हे काय? यासाठीच तर श्रावण महिन्याच्या अमावस्येला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आपल्या देशात रूढ झाली आहे.

बैलासाठी संस्कृत वाङ्मयात वृषभ, पोळ, खोंड, वाह, बलिवर्द, उक्षाण इत्यादी नावांचा उल्लेख आढळतो. जो नेहमी शेतकर्‍यांवर सुखाचा वर्षाव करतो, म्हणून तो वृषभ! बळाने परिपूर्ण आहे, म्हणून बलिवर्द किंवा बैल! ऋग्वेदात एके ठिकाणी नांगराच्या साह्याने बैलांच्या मेहनतीतून उत्कृष्ट बियाणे पेरून अन्नाचे भरपूर उत्पादन घ्यावे, असा उल्लेख आला आहे, तर ऋषी पाराशर एके ठिकाणी नांगराचे विविध प्रकार वर्णन करताना नांगर हा आठ बैलांचा, सहा बैलांचा, चार बैलांचा किंवा दोन बैलांचा असतो, असे म्हणतात. याच बैलाच्या साह्याने शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची सर्व कामे करतो. यात कुळवणी, पेरणी, कोळपणी तसेच इतर सर्व कामांचा समावेश आहे.

अगदी प्रारंभापासून शेवटपर्यंत खर्‍या अर्थाने हा बैल शेतकर्‍यांचा मित्र आहे. भूमीत बीज पेरणीच्या अगोदरपासून त्याच्या कष्टाला प्रारंभ होतो आणि शेवटी धान्याची रास घरामध्ये आणून ठेवेपर्यंत तो आपला खरा मदतनीस असतो. इतकेच काय तर बैलगाडीतून धान्य व इतर ओझे वाहून घेऊन जाण्याबरोबरच आपल्या बळीराजांच्या कुटुंबालादेखील अगदी ऐशोआरामात बसवून या गावाहून त्या गावापर्यंत घेऊन जातो. जुन्या काळात तर मोठ्या प्रमाणात बैलांच्या साहाय्यानेच वाहकीची सर्व कामे केली जात असत. एका दृष्टीने बैल हा अत्यंत जवळचा साहाय्यक मित्रच मानले जात असे. आपली सर्व कामेदेखील तो अगदी प्रसन्न वदनाने करतो. माणसाला कदाचित कंटाळा येऊ शकतो. परंतु, बैल नावाचा सहनशील मित्र मात्र कधीही थांबत नाही की, निराश होत नाही. बैलाचे स्वतःसाठी असे काहीच नाही. जे काही आहे.

ते मानवासाठीच! दुर्दैवाने आजच्या यांत्रिक युगातील मानव हा या अतिशय उपकारक, अशा जीवाचे महत्त्व विसरून अधिक धान्योत्पादन मिळवण्याच्या हव्यासापोटी बैलांना दूर ठेवत आहे. यंत्राच्या साहाय्याने शेतीची उत्पादकता नाहीशी करीत आहे. कारण, बैलांच्या पदस्पर्शाने भूमीला मोठ्या प्रमाणात शेण व मूत्र मिळते. त्यामुळे जमीन सुपीक बनते. तसेच, बैलांच्या पायातील खुरामुळे जमीन भुसभुशीत होते. त्याच्या शिंगातही कॅल्शियम व नत्र असते. बैलाच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयवदेखील कामास येतात. त्यांच्या शिंगात पाणी, माती व शेण भरून ते जमिनीत पुरल्यास फार मोठे लाभ होतात.तसेच, बैलांच्या हाडांमध्ये कॅल्शियम, चुना व खरा असतो. त्यात फॉस्फरस, पोटॅशियम व नत्र असते. हाडांचा चुरा करून तो शेतात टाकला असता त्याचा चांगला फायदा होतो. त्याचबरोबर शेणाचा उपयोग खत म्हणून तर होतोच; पण त्याबरोबरच मातीदेखील पांढरी पडते. नत्रामुळे शेतीची उत्पादनक्षमतादेखील वाढते.

अशा या निरुपद्रवी व उपकारक जीवाला सध्याची व्यवस्था कत्तलखान्यात पाठवून त्याची हत्या करीत आहे. शुद्ध शाकाहारी असलेल्या या पवित्र प्राण्याचे मांसभक्षणासाठी आजचा माणूस फारच चटावलाय. याचे दुष्परिणाम काही दूर नाहीत. हे माणसाला भोगावेच लागतील.

या थोर कृषी मित्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा पोळा हा सण. यानिमित्त या वृषभदेवाच्या सद्गुणांचे पूजन करून त्यांच्या रक्षणाचा संकल्प करू या!

करी जो भूमीचे रक्षण
देई कृषकां नित सुधन ,
परोपकारी त्या वृषभदेवास
आमचे कृतज्ञतापूर्वक वंदन!

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य 
९४२०३३०१७८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.