नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी येथे झालेल्या पुरातत्व उत्खननामध्ये सापडलेल्या प्राचीन मूर्त्यांची छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतपराय यांनी समाजमाध्यमांवर सार्वजनिक केली आहेत.
श्रीरामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष समोर आल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात अनेक पुतळे आणि खांब दिसतात. हे २१ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये एएसआय टीमला उत्खननादरम्यान सापडले होते. अवशेषांची संख्या सुमारे ५० आहे. यामध्ये ८ तुटलेले खांब, ६ खंडित मूर्ती, ५-६ मातीची भांडी आणि ६-७ कळसांचा समावेश आहे. हे अवशेष ५०० वर्षे जुने असल्याचा दावा संतसमुदायाने केला आहे. २१ वर्षांपूर्वी रामलला मंदिराच्या गर्भगृहाभोवती उत्खननादरम्यान हे सापडले होते.
अवशेषांमध्ये काळ्या कसोटीच्या दगडापासून बनवलेले खांब, गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेल्या देवतांच्या मूर्ती, मातीचे कलश आणि मंदिरातील कोरीव दगडांचे तुकडे यांचा समावेश आहे. हे अवशेष रामललाच्या तात्पुरत्या मंदिराच्या एक्झिट गेटजवळ सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना ते पहावयास मिळणार आहेत.