।। श्री शंकर ।। ।। श्री अस्मदगुरुभ्यो नमः ।।
आज श्रावण वद्य त्रयोदशी अर्थात पु. स्वामुजींची समाधी तिथीचा दिवस दासगणु परीवारातील सर्व साधकांसाठी तसेच महाराष्ट्रातील साधकांसाठी विशेष तिथि कारण याच तिथिला संतकवि दासगणु महाराजांचे शिष्य आणि महाभारताचे गाढे अभ्यासक कवी कीर्तनकार कुशल वैद्य हिंदुत्वाचा तसेच हिंदु संस्कृतीचा रास्त अभिमान व स्वाभिमान असणारे असे लेखक, व्याख्याते, प्रवक्ते पु.अनंतमहाराज आठवले यांनी उत्तरकाशी येथे समाधिस्थ झाले तसेच महाराष्ट्राच्या संत परंपरेला शांकरसंन्यासी परंपरेस जोडुन पु.स्वामीजींनी एक इतिहास घडवला महाराष्ट्रीयन संतपरंपरेच्या विचारांवर अद्वैतमताचा पगडा आहे हे सर्वमान्य आहे.
खुद्द श्री ज्ञानोबरायांनी "भाष्याकार वाट पुसती" या ओवी द्वारे निर्देश केलाच आहे ते भाष्यकार कोण यावर बरेच वादगं झाले होते. मात्र समोर रामदास स्वामी तुकोबाराय तसेच नाथमहाराजांनी हीच परंपरा चालु ठेवली या सर्वांनी अद्वैत मताचा ठामपणे पुरस्कार केला तसेच प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहणारे स्वामीजी पहिलेच मराठी संत परंपरेतील साधक व विचारवंत होत. म्हणजे गीतेवरील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आणि लो. टिळकांनाचे गीतारहस्य तसेच ब्रम्हसुत्रावर स्वतंत्र टिका केली आणि गुरुदेव रानडे यांचे उपनिषद व गीतेवरील भाष्य बेलसरेंच उपनिषदावरील भाष्य हे सगळे पाहिले असता कोणाचे तरी एक प्रस्थान भाष्य राहिले कोणाच उपनिषदावर तर कोणाचे ब्रम्हसुत्रावर हे पाहता म्हणुन महाराष्ट्रातील साधकांसाठी हि विशेष अशी हि तिथी. आचार्य पदाला शोभेल अशी विपुल ग्रंथसंपदा या सोबतच प्रंचड लेखनप्रपंच आणि चौफेर लेखनाचा विस्तार
आयुर्वेद , वेदांत, तत्त्वज्ञान, राष्ट्रप्रेम धर्मशास्त्र , प्रस्थानत्रींवर भाष्य ,(ब्रम्हसुत्र,उपनिषद श्रीमद्भगीता यांना प्रस्थानत्रयी म्हणतात ) समीक्षात्मक लेखन इ. विषयांवर सोप्या गद्य पद्य या प्रकारात केलेले विवरणात्मक लेखन व भाष्य आहे. प्रस्तुत लेखात पु.स्वामीजींच्या प्रस्थानत्रयवरील भाष्यग्रंथाचा थोडक्यात व धावत्या शब्दातुन परीचय करुन देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
★ब्रम्हसुत्रे व त्यावरील ब्रम्हसुत्रार्थदर्शिनी या भाष्याचा थोडक्यात परीचय ★ :
★अ) ब्रम्हसुत्रे★ : उपनिषदातील तत्वज्ञान मुळात विखुरलेले व काही ठिकाणाची विधाने ही पररस्पर विरोधाभासी वाटत असल्यामुळें वेदांत दर्शानाची सुत्रबद्ध न्यायसमंत मांडणीची आवश्यकता होती म्हणून भगवान वेदव्यासांनी हे कठीण काम ब्रम्हसुत्राद्वारे केले म्हणून ब्रम्हसुत्रे ही " न्यायप्रस्थान' म्हणून वेदांत क्षेत्रात ओळखली जाते. ब्रम्हसुत्राचे चार अध्याय आहे अनुक्रमे समन्वयाध्याय, अविरोधाध्याय ,साधनाध्यय आणि चवथा मुलाध्याय हे चार अध्याय प्रत्येकी पादात विभागलेले आहेत तर प्रत्येक पादात एकेका विषयासाठी एकेक अधिकरण अधिकरणात विषयांनुसार एक किंवा अनेक सुत्रे अशी १९१ अधिकरणे आहेत सुत्रांची संख्या ५५५ एवढी आहे.
★ब) ब्रम्हसुत्रार्थदर्शिनी ★
पू.स्वामीजींनी सुत्रादर्शिनी लिहिताना मराठीत उपलब्ध असलेल्या टिकांचा परामर्श घेतला आहे. यात लो.टिळक बापटशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर श्री द देशमुख.ल़ो. टिळक सोडता बाकींनी शांकर भाष्याचे भाषांतर केले असे म्हणणे रास्त ठरले. भाष्याचे विस्तृत परिशीलन करणे माझ्यासारख्याच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. पु.स्वामीजींचे भाष्य हे संपूर्ण ५५५ सुत्रांवर आहे तसेच विस्तृत ही आहे. या भाष्याचे वैशिष्ट्य हे आहे की खंडन मंडन या पद्धतीपेक्षा विवरणपद्धतीवर जोर दिला. सुत्रादर्शिनी मध्ये नमनाच्या एकुण २८४ ओव्या आहेत या सर्वच्यासर्व महत्त्वाच्या आहेत.
पू.स्वामीजींची नम्रता त्यांच्या ओवीगत लक्षात येते
मी न पंडीत विद्वान ।
कवि वा प्रतिभासंपन्न ।।
तर्क मीमांसा व्याकरण ।
माझ्या नसती ओळखीचे ।। (२५२)
ब्रम्हसुत्रार्थदर्शिनी लिहण्याचे प्रयोजन
पुढे २६० ओवीत लिहिता
कारण विद्ववजनांसाठी ।
माझी नसे हि खटपटी ।।
मी या करितो गुजगोष्टी ।
पू.स्वामीजींनी सगळ्या पूर्वाचार्यांना सादर साष्टांग वंदन केले आहे.
यात रामानुज, मध्व, निंबार्क वल्लभ ते बलदेव श्रीकंठ विज्ञानभिक्षु यांचाही उल्लेख केला आहे पु.स्वामीजींच्या मते प्रत्येक आचार्यांनी देशकाल परिस्थितीनुसार त्यांची मते मांडली म्हणून ते थोर व वंदनीय आहेत हा समन्वयाचा परिपेक्ष महत्वाचा तसेच आणि विशेषाभार मानले ते आद्य शंकराचार्यांचे
ते म्हणतात
महाराज आपल्या भाष्यावर ।
माझा अवघा आहे भार ।
आपुल्या वाणीचा आधार ।
लाभो माझ्या बुद्धीस ।।
ज्ञानोबारायांना बद्दल लिहलेला वाचताना
मन भावननेच्या सागर न्हाऊन निघते
पु.स्वामीजी म्हणतात
मार्तंड व्हावा तापहीन ।
प्रभा तैशीच राहुन ।
तैसे अद्वैताचे ज्ञान ।
कोमल केले भक्तीभावे ।।
पुढे १६७,१७० व १७२ या ओवी खरच वाचन व चिंतनासाठी आवश्यक आहे. सद्गुरूनिष्ठा ,नारायणाचे एकनिष्ठ भक्त आद्य शंकराचार्य आणि ज्ञानोबाराय ही तर त्यांची श्रद्धास्थाने या सर्वांना बद्दलचा आदर। या ब्रम्हसुत्र भाष्यात जागोजागी दिसतो. पू.अप्पांनी महाभारत गीता ब्रम्हसुत्रे लिहणारे वेदव्यास एकच आहेत हे ठामपणे सांगितले.( ब्र.सुत्र ओवी ११७ ते १२८) विद्वानजनात याबाबत मतभिन्नता आहे. या तत्वज्ञानपर ग्रंथास अद्वैतसिद्धीप्रमाणे व ज्ञानेश्वरीप्रमाणे ओव्यांचा माध्यमातून भक्तीचा अप्रतिम मुलामा पु.स्वामीजींनी चढविला आहे.
एका ओवीत अद्वैताची व्याख्या फार मार्मिकपणे व समजले अशा ओवीत बांधतात
अन्न पोटात जेंव्हा जाते ।
तेंव्हा विविधता टाकते ।
शेवटी पचता होऊन जाते ।
एकरुप शरिरासी ।।
अन्नाचे प्रकार द्वैत ।
पचणे आहे अद्वैत ।
तात्पर्य शोधित श्रुतीत ।
हिच दृष्टी ठेवावी ।।
शेवटी लेखन मर्यादा लक्षात ब्रम्हसुत्रार्थदर्शिनी वरील लेखनाचा भाग थांबितो. पण हे सुत्रादर्शिनी प्रत्येकाने वाचावी व संग्रह्या ठेवावी.
★उपनिषद भाष्य★ : वेदांताच्या व
प्रस्थानत्रयींच्या क्षेत्रात उपनिषद ही मुळ श्रुति प्रस्थान म्हणून ओळखली जाते. प्रमुख बारा उपनिषदांवर पु.स्वामीजींनी गद्य /पद्य या स्वरुपात "उपनिषदर्थ कौमुदी " नावाचे पाच खंडात भाष्य लिहले. हे भाष्य ही स्वतंत्र अशा प्रतिभेचे म्हाणावे लागेल या भाष्याचे वैशिष्ट्य असे मराठी वेदांत साहित्य क्षेत्रात महानारायण या उपनिषदावर कुठेही भाष्य व टिका उपलब्ध नाही पू.स्वामीजींच्या पाचव्या खंडात हि टिका समावष्टी आहे. या उपनिषद भाष्यावर वेदांताचे व्यासंगी विद्वान डॉ. चिं.ग.काशीकर म्हणतात " प्रा.आठवले यांनी कौमुदीच्या रुपाने मराठी साहित्य क्षेत्रात प्रशंसनीय कामिगिरी केली"
तर डॉ. वा.पु.गुंडे म्हणतात "भाष्यग्रंथ विद्वज्जड होण्याची शक्यता असते पण येथे प्रा.आठवले यांनी विचारांची घनता हारवु.न देता केलेले हे सारे विवेचन विलक्षण आकलन सुलभ होऊन जाते.
एकुण पाच खंडातील हे भाष्य खालीलप्रमाणे
१) खंड पहिला। : ईशावास्य व मांडुक्यावरील गद्यातील विवरण
२) खंड दुसरा : एकुण सहा उपनिषदांवरील ओवीबद्ध टिका यात केन कठ प्रश्न मुंडक ऐतरेय व तैत्तिरीय यांचा समावेश.
३) खंड तिसरा : या खंडात छांदोग्य या उपनिषदावर ओवीबद्ध टिका
४) खंड चौथा : बृहदारण्यक या उपनिषदावर गद्यातील टिका
५) खंड पाचवा : श्वेताश्वतर आणि महानारायण या उपनिषदांवर ओवीबद्ध टिका.
वरील भाष्ये समजण्यासाठी व भाष्याची पार्श्वभूमी। लक्षात यावी यासाठी अनुक्रमे डॉ. वा.पु.गिंडे, डॉ. कल्याणी नामजोशी ,
श्री वा ल मंजूळ, श्री भानुदास महाराज देगलूरकर व डॉ. श्री वा.अत्रे यांचे परीक्षणात्मक लेख वाचणे आवश्यक आहे लेखविस्तार भयास्तव काही लिहिणे अशक्य आहे.
★गीताभाष्य★ : प्रस्थानत्रयीत श्रीमद्भगीता ही स्मृती प्रस्थान म्हणून ओळखली जाते कारण उपनिषदांचे तत्वज्ञान सामान्य जनास समजेल अशा स्वरुपात गीतेची मांडणी झाली व त्याचा जीवनाशी असलेला संबंध विशद करुन श्रीमद्भगीतेने जगावर उपकारच केले आहे. हाच धागा पू.स्वामीजींनी पकडून गीताभाष्याची मांडणी केली आहे. या बद्दल डॉ.कल्याण काळे म्हणतात " प्राचार्यांच्या गीता विवेचनात धर्म निति विचार ज्ञानाचा सुरेख संगम झाला आहे. या गीताभाष्या बद्दल ★प.पू.किशोरजी व्यासांनी गीता भाष्याचा पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेत म्हणतात★
" लोकमान्य टिळकांचे “गीता-रहस्य" व त्यातील वाक्पटुत्व स्तिमित करणारे आहे पण प्रत्येक ठिकाणी “योग” शब्दामागे कंसात कर्म शब्द घातल्यामुळे यथार्थ प्रतिपादना पेक्षा हेतुपूर्ण प्रचाराचे रूप त्याला आलेले दिसते. गुरुदेव रानडे यांची मीमांसा श्रेष्ठ दर्जाची असली तरी अखंड नाम-स्मरण हाच निष्काम कर्मयोग किंवा ध्यानात समोर येणारे भगवंतांचे रूप हाच परमेश्वरी अवतार ! अशी त्यांची विधाने कितपत स्वीकार्य व्हावी हा प्रश्न पडतो. ब्रह्मकुमारीच्या गीता विद्यालयातून चाललेला अध्यात्म प्रचार सोज्वळ वाटला तरी सनातन परंपरेतल्या लोकांना कुलधर्म कुलाचारापासून वंचित करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम तर नाही ना ! अशी शंका येते. मी हिंदु आहे हे स्वाभिमानाने सांगता येत नसेल व अयोध्येतील कलंक पुसून टाकण्याच्या पुरुषार्थपर्वाचे साधे प्रकट अभिनंदनही करता येत नसेल तर सर्वोदयाच्या मार्गाने चाललेल्या स्वाध्यायसंमोहनाने वर्षानुवर्षे गीता वाचूनही अर्जुनाचा बृहन्नडा अंशच पुरस्कारिला की काय ? असा प्रश्न पडतो. इस्कॉनने प्रकाशित केलेली "गीता - जशी आहे तशी " या सांप्रदायिक भाष्यामध्ये भक्तिपर मते औचित्यपूर्ण वाटली तरी त्यातील अनावश्यक आचार्यविरोधाने तत्त्व दृष्ट्या ही टीका गीता जशी नाही, तशी सांगण्यासाठी तर नाही ना ! असे वाटू लागते.
या व अशा अनेक विचारधारांमधून गीतार्थाची चाललेली ओढाताण व आपल्या मतांच्या समर्थनार्थ आधारापुरती गीता वापरण्याचे तंत्र पाहून जिज्ञासु अभ्यासकाला संभ्रम निर होईल तर नवल ! अशा स्थितित या मता- मतांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याच चांगला मार्ग म्हणजे प.पू.स्वामी वरदानंद भारती गीतार्थची मीमांसा करणारे भाष्य.
एकूणच पू. स्वामीजींच्या विवेचन प्रवाहाला तसेच यातील विचार आधुनिक सुविद्य तरुणांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतील व परंपरापालनाबद्दलची त्यांची दृष्टी निर्दोष होईल, यात शंका नाही. या विचारांची समाजास आज फारच गरज आहे. परंपरेचा विज्ञानाशी सुसंवाद, महिलांचे विशेष दायित्व, तथाकथित सुधारकांच्या व्यवहारातील अंतर्विरोध यांचे प्रतिपादन चिंतनीय आहे. देशभक्तीचा पोकळ आव आणून धार्मिक कुलाचारांचा उपहास करणाऱ्या तथाकथित हिन्दुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी तर हे संदर्भ पुन्हा पुन्हा वाचावेत असे प्रकर्षाने वाटते. पू.स्वामीजींचे गीताभाष्य म्हणजे अध्यात्मिक चिंतनासह राष्ट्रचिंतानाचे स्वनुभवात्मक असे विवरण म्हणता येईल.
★समारोप★ : या शिवाय अनेकविध संस्कृत व मराठी स्तोत्र विविध देवतांची व संतांची नद्यांची तसेच रामदासी व वारकरी संप्रदायाचा अनोखा मिलाफ मनाच्या श्लोकांवरील मनोबोध नावाचे अप्रतिम भाष्य आणि ज्ञानेश्वरीचा भावार्थ घेवुन अनुवाद ज्ञानेश्वरी नावाचे ओवीबद्ध गीतेचे विवरण.वाटा आपल्या हिताच्या , महाभारताचे वास्तव दर्शन श्रीकृष्ण दर्शन
साधन चतुष्ट्यावरील साधक साधना नावाचे भाष्य श्रीकृष्णकथामृत सारखे महाकाव्य शालिवाहन सारखे खंडकाव्य हिंदू धर्म समजुन घ्या संघ प्रार्थना वरील बुद्धीवादी विवचेन वाटा आपल्या हिताच्या या मध्ये दिले उत्तरे म्हणजे पाखंड खंडनच होय
लेखाचा शेवट पंढरपूर येथील वेदांतशास्त्राचे गाढे अभ्यासक वै. गोपाळशास्त्री गोरे यांचा आभिप्रायाने करतो.
" गद्यांत मनमोकळे पणाने लिहीता येतें तसे काव्यात जमत नाही. काव्य करण्यासाठी एक विशेष प्रतिभा लाभते. आणि ती प्रतिभा सर्वानाच म्हणजे विद्वानाना देखील असतेच असे नाही. दांसगणूच्या कृपेने
ह.भ. प श्री अ. दा. तथा आप्पांशास्त्री आठवले याना तशी अलौकिक प्रतिभा आहे. हे त्यानी 'ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी नावाचा ओवीबद्ध ग्रंथ लिहील्यावरून स्पष्ट झाले आहे भाष्यार्थ कळणे कठीण त्यात तो सांगणे अवघड त्यांतही गद्यांत फारच दुर्धट आणि 'ओवी' रुपाने लिहीणें तर सर्वांत दुष्कर पण श्री अप्पाशास्त्रींनी हा ग्रंथ अतीव सुबोध व अलंकारीक भाषेत लिहीला आहे, त्या त्या प्रसंगातील उपमा दृष्टांत तर फारच सुंदर आहेत. यावरुन त्यांच्या सखोल ज्ञानाची कल्पना येईल भाष्यार्थ समजण्यासाठी न्याय मीमांसा इत्यादी शास्त्रांच्या ज्ञानाची अवश्यकता आहे. श्री अनंतराव माझे श्रीगुरुचण पं. प्रा. कै. धारूरकरशास्त्रीकडे येत असत. शिवाय अप्पाशात्री हे आजानसिद्ध देवाप्रमाणें स्वतः सिद्ध आहेत हे त्यांनी लिहोलेल्या 'ब्रह्मसुत्रार्थदर्शनी' या भाष्यातुन लक्षात येईल. श्री अनंतराव जसें उत्कृष्ट कवि तसेच अप्रतिम वक्ते आहेत. त्यांच्या कीर्तनाला तर अफट गर्दी असते, कथा प्रवचन कीर्तन म्हणजे वृद्धांची गर्दी. पण श्री अप्पांच्या कीर्तनाला तर तरुणाचा समाज अप्पामुळे पाश्चात्य विद्या विभूषित तरुणांच्या मनातही वेद ईश्वर विद्वान याविषयी श्रद्धा निर्माण झाली या वरुन अप्पांच्या वक्तृत्वाची कल्पना येईल.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
संदर्भग्रंथ :
१)ब्रम्हसुत्रार्थदर्शिनी : स्वामी वरदानंद भारती
२) उपनिषदार्थ कौमुदी : स्वामी वरदानंद भारती
३) गीताभाष्य : स्वामी वरदानंद भारती
४) हि अनंत संपदा : ग प्र परांजपे
५) आमचे अप्पा आमचे स्वामी
६) सा.पंढरी प्रहराचे जुने अंक
७) विविध मासिक वर्तमानपत्रातील लेख
- यो. नं. काटे, नांदेड