निसर्गाच्या व्यवस्थेत अतिमानवी हस्तक्षेपामुळे पावसाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. देशातील काही भागात अतिवृष्टीचा कहर सुरूच असून, काही भागात सरासरी गाठत नसल्यामुळे पावसासाठी बळीराजाला पर्जन्यराजाला रडवतो आहे, असे परस्परविरोधी चित्र निर्माण झाले आहे. महिनाअखेर यंदाचा मान्सून निरोप घेण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले, तर देशातील उर्वरित भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस झाला असून, राज्यात ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या, ज्यात सुमारे अडीचशे जणांचा जीव गेला. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले. देशातील अनेक भागांत पडलेला अधिकचा पाऊस पाण्यातच जात असतो. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मिरात होणारा अधिकचा पाऊस तसेच पाहिला, तर फारसा लाभदायी नाही. या राज्यांमध्ये हिमवृष्टी अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात अपेक्षेपेक्षाही फारच कमी हिमवृष्टी नोंदवली गेली. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या या भागात नेहमीपेक्षा यंदा तापमानाने उच्चांक गाठला. त्यातच अपेक्षेपेक्षाही अधिकचा पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीही झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलत असल्याचे हे संकेत मानले जात असून, विकास प्रकल्पांमुळे नष्ट होणारी वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवी प्रगतीसाठी विकास हवाच आहे. मात्र, तो पर्यावरणपूरक असावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, शासकीय नियमांचे आणि पर्यावरणाला आवश्यक असलेल्या बाबींकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करतात, त्यातूनच वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असून, त्याचा थेट परिणाम पर्जन्यवृष्टीवर होऊ लागला आहे. ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे पाऊस बरसत नाही आणि जेथे नकोसा आहे, तेथे थांबवण्याची चिन्हे नाहीत. वरुणराजाची ही स्थिती केवळ भारतातच आहे, असे नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र हीच अवस्था आहे. त्यामुळे मानवाने वेळीच सावध होणे गरजेचे आहे, अन्यथा, मानवाचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पर्जन्यमान किती होणार, याची सरासरी विविध प्रकारांनी जाहीर केली जाते. त्यात देशविदेशातील हवामान विभागांच्या निष्कर्षावर आधारित पावसाची टक्केवारी जाहीर केली जाते. यंदा देशात सरासरी ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यात कोणत्या महिन्यात आणि भागात पावसाचे प्रमाण किती असेल, हेदेखील नमूद करण्यात आले होते. देशात पंधरवडा उशिराने पावसाचे आगमन झाले, त्यात जून महिन्यात फारसा पाऊस झाला नाही. जुलै-ऑगस्टमध्ये सक्रिय झालेल्या पावसाने देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक नोंद केली. मात्र, ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस मंदावला. सप्टेंबर महिन्यात पुनरागमन झालेल्या पावसामुळे दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. यंदाचा मान्सूनही याच महिन्यात निरोप घेण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप सरासरीपेक्षा ११ टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ज्याचा परिणाम पीक-पाण्यावर निश्चितच होणार आहे. पुनरागमन झालेल्या पावसाने एकीकडे उत्तराखंड-उत्तर प्रदेशपासून केरळ-तामिळनाडूपर्यंत कहर केला आहे. या भागात चांगला पाऊस पडत आहे, तर महाराष्ट्रासह अन्य भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाच्या सर्वसाधारण सरासरीप्रमाणे तसेच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दि. १ जून ते ८ सप्टेंबरदरम्यान देशात ७५४.५ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, तो केवळ ६७५.२ मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत स्थिती अधिक चिंताजनक. राज्यात काही भागांत पुन्हा बरसू लागला असला, तरी अनेक भागांत पावसाचा वेग मंदावलेलाच आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे, बंगालच्या उपसागरात अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने राज्यातील पावसाचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या इतर राज्यांच्या तुलनेत केवळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी ८२७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा फारच कमी आहे. यंदा ही तूट या महिनाअखेर भरून निघावी, हीच प्रार्थना!
मदन बडगुजर