मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते का?
12-Sep-2023
Total Views |
पहिला शिवसैनिक अशी ज्यांची ओळख होती, ते म्हणजे मनोहर जोशी. शिवसेना पक्ष कायम आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखला जातं. अशा आक्रमक पक्षाला मनोहर जोशींनी कधी-कधी शांततेत सुद्धा क्रांती होऊ शकते, हे शिकवलं. आज मनोहर जोशींची आठवण काढण्याच कारणं म्हणजे, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेला एक खुलासा, २००० साली मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्यास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मला उकसवलं होतं, संजय राऊत यांनी तर थेट पेट्रोल टाकून संपूर्ण घर जाळण्याचा सल्ला दिला होता. असा धक्कादायक खुलासा शिवसेना आमदार सदा सरवणकार यांनी केला.
सदा सरवणकरांच्या या खुलाश्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मनोहर जोशी विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद चर्चेत आला. मनोहर जोशी म्हणजे बाळासाहेबांची सावली आणि बाळासाहेबांच्या जाण्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर दसरा मेळाव्यात त्यांचा करण्यात आलेला अपमान. मनोहर जोशींचा हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळेच आज आपण मनोहर जोशींचा राजकीय प्रवास आणि उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा असलेल्या वाद यांची माहिती घेऊ.
मनोहर जोशींच मुळ गाव तसं रायगड जिल्ह्यातील नांदवी. मनोहर जोशींचे शिक्षण मात्र मुंबईत झाले. वकीलीचे शिक्षण पूर्ण करुन बीएमसीमध्ये अधिकारी झालेल्या मनोहर जोशींनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेबांची साथ दिली. बाळासाहेबांचा निष्टावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख त्याच काळात निर्माण झाली.
१९६७ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर मनोहर जोशींना १९६८ मध्ये लोकप्रतिनिधी बनण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये नगरसेवक झालेले मनोहर जोशी १९७० मध्ये स्थायी समितीचे अध्यश बनले. त्यानंतर लगेच १९७२ ला मनोहर जोशींची निवड विधान परिषदेवर करण्यात आली. अशाप्रकारे मनोहर जोशी राजकारणात प्रवेश केल्यापासून अवघ्या ५ वर्षात आमदार झाले. १९७२ पासून मनोहर जोशी सलग तीन टर्म शिवसेनेकडून आमदार राहिले.
मात्र, १९९० ला मनोहर जोशींनी विधानभा निवडणूक लढवली. मार्च १९९५ मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशींना मुख्यमंत्री पद मिळालं. अशाप्रकारे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनण्याचा मान मनोहर जोशींना मिळाला.
१९९५ ते १९९९ मुख्यमंत्री राहिल्यानंतर मनोहर जोशी दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले. त्यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार होते. खासदार होताच मनोहर जोशींना अटलबिहारी वाजपेयीच्या सरकारच्या मंत्रीमंडळात सामील करण्यात आलं. त्यानंतर २००२ ते २००४ मध्ये मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्षही झाले. ही झाली मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द.
मनोहर जोशींच्या राजकीय कारकीर्दीकडे पाहिल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ती म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला आलेले मोठं पद कायम मनोहर जोशींना मिळालं. त्याला कारण होते बाळासाहेब ठाकरें. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तरी, कधीही बाळासाहेबांच्या शब्दांच्या बाहेर गेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर टीकाही होत. पण मनोहर जोशींनी बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा कधीच कमी होऊ दिली नाही. पण बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंसोबत जळवून घेण्यात मनोहर जोशींना जमलं नाही.
उद्धव ठाकरेंची कायम मवाळ भूमिका मनोहर जोशींनी कधीच मान्य केली नाही किंवा असं म्हणता येईल की, उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाला योग्य तो सन्मान दिला नाही. दसरा मेळाव्यात मनोहर जोशींचा करण्यात आलेला अपमान असो की, सदा सरवणकरांनी केलेला खुलासा असो, उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी बाळासाहेबांसोबत असलेल्या नेत्यांना साईडलाईन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
फक्त मनोहर जोशीच का? नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कंटाळून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. पण त्याकाळात उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या चांगल्या स्थितीत होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सर्व पक्ष शिंदेंच्या नेतृत्वात एकटवला आहे.
त्यामुळे आज उद्धव ठाकरेंना पुन्हा आपल्या जुन्या शिवसैनिकांची आठवण येतेय. पण आता वेळ निघून गेलीये. उद्धव ठाकरेंनी ९ वर्षापूर्वी ज्याप्रकारे मनोहर जोशींना राजकीय दृष्ट्या विजानवासात पाठवलं होत. तीच वेळ एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरें यांच्यावर आणली आहे.
श्रेयश खरात
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.