मुंबई : राज्य सरकारच्या माध्यमातून तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच, राज्यातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासिकेचा लाभ घेवून स्वविकास करतील, अशा आशावाद मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढादेखील उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मंत्री लोढा म्हणाले.
तसेच, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी मंत्री लोढा यांच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कौशल्य विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा ‘स्वयंसेवक ते जनसेवक’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.