मुंबई : ''उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,'' असा इशारा भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाच्या नेत्यांना दिला आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्यासाठी जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी , अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात भारताची मान उंचावली ,मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धा लावली आहे. या नेत्यांच्या बालीशपणाची कीव येते . स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदुषकासारखी झाली आहे. विदुषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात पण हे कामदेखील ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही. त्यामुळे भाजप महिला मोर्चा तर्फे उद्धव ठाकरे यांना विदुषकाचा पोषाख पाठवत असून हा पोषाख पाहून ठाकरेंना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल,'' असेही त्या यावेळी म्हणाल्या.
''ठाकरेंनी आपल्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत मात्र यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल,'' असा इशारा चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे.