कल्याण : रुक्मीणीबाई रुग्णालयातील महिला प्रसुती प्रकरणात मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसे आरोग्य विभागाच्या महिला अधिकारी अश्विनी पाटील आणि प्रतिभा पाटील यांचा सत्कारासाठी कल्याण येथील महापालिका मुख्यालयात दाखल झाले. पण त्यावेळी या दोन्ही महिला अधिकारी गायब झाल्या होत्या. त्यामुळे विभागाच्या गेटवर ओढणीने गेट बंद केले आणि ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि पत्र गेटवर बांधून तीव्र निषेध व्यक्त केला. मनसेच्या आंदोलनामुळे सुरक्षारक्षक आणि पोलिस प्रशासन यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी महापालिकेच्या भोंगळ कारभारविरोधात मनसेने जोरदार घोषणाबाजी केली.
कडोंमपाच्या रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशदारातच महिलेची प्रसुती प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातच राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून आयुक्तांना सज्जड दम दिला गेला आहे. तर सोमवारी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी उर्मिला तांबे, शितल विखणकर, उदय वाघमारे, कपिल पवार, महेंद्र कुंदे आणि मनसैनिक यांनी हातात पुष्पगुच्छ, ट्रॉफी घेऊन घोषणाबाजी करीत कडोंपमा मुख्यालयाच्या आरोग्य खात्यात दाखल झाले.
मनसे कार्यकत्र्याना सुरक्षारक्षकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धरले होते. मनसे कार्यकर्ते येणार असल्याची भणक लागताच दोन्ही महिला आरोग्य अधिकारी महापालिका मुख्यालयातून बाहेर निघाल्या होत्या अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रंनी दिली. मात्र मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दोन्ही महिला आरोग्य अधिका:यांचा सत्कार करण्यावर ठाम होते. पण आरोग्य महिला अधिकारी समोर आल्या नाहीत अखेर संतप्त झालेल्या महिलांनी खात्यांचे प्रवेशद्वार ओढणीने गच्च बांधून एका ही कर्मचारी अधिका:याला कार्यालायाच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी गेटवरच पुष्पगुच्छ, ट्रॉफी आणि पत्र ठेवून महापालिकेच्या आरोग्य खात्यातील गलथान कारभारचा निषेध व्यक्त केला.