मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधा; टाळे ठोकण्याचा भाजयुमोचा इशारा

11 Sep 2023 18:41:18


thane


ठाणे :
ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाला आहे.गेल्या अनेक दिवसापासून वीज पुरवठा खंडित,पाणी पुरवठा बंद,भिंतीच्या प्लास्टरची पडझड, जागोजाग साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची वानवा आदींमुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजयुमो आणि युवासेनेच्या (शिंदे गट) यांच्यावतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.तसेच, दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
 
ठाणे व त्यापुढील लाखो विद्यार्थ्यांचा मुंबईपर्यंतचा फेरा वाचावा, त्रास वाचावा, तसेच विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण व विविध अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत, या हेतूने ठाणे महापालिकेने २०१४ साली बाळकुम,ढोकाळी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले.मात्र, उपकेंद्रात अस्वच्छता पसरली असुन दुरवस्था बनली आहे. सहापैकी पाच शिक्षक उपलब्ध नाहीत. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला असुन गेल्या महिन्याभरापासुन येथे पाण्याची देखील वानवा आहे. अशा तक्रारींचा पाढाच विद्यार्थ्यानी वाचला.

याबाबत येथील अधिकारी व संचालकांकडे तक्रारी केल्या असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे संतप्त होत भाजपचे माजी नगरसेवक संदीप लेले तसेच भाजयुमोचे ठाणे शहर अध्यक्ष सुरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी तसेच युवासेनेने सोमवारी विद्यापीठ उपकेंद्रावर धडक मारून निदर्शने केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी लक्ष घालण्याची मागणी करीत दोन दिवसात कार्यवाही करा अन्यथा उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा भाजयुमोने दिला आहे.

 
Powered By Sangraha 9.0