'स्पेस स्टेशन' मध्ये जाणार भारताचा पहिला अंतराळवीर!
11-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इस्रोने इतिहास रचला. आता आपला देश लवकरच अंतराळ महासत्ता म्हणून ओळखला जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनच्या तियांगॉंग अंतराळ स्थानकानंतर भारत जगातील तिसरे अंतराळ स्थानक ( स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. आयएसएस आणि चीनच्या स्पेस स्टेशनच्या तुलनेत ते अनेक अर्थांनी खास असेल.
चांद्रयान-३ मोहिमेनंतर, भारताने आदित्य एल-१ मिशन लाँच केले आहे, आता भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी मिशन गगनयानची तयारी सुरू आहे. जी इस्रोची पहिली मानवीय मोहीम असेल. त्यानंतर लगेचच, भारत स्पेस स्टेशन प्रकल्पावर काम सुरू करणार आहे ज्यामुळे भारत जगातील सर्वोच्च अंतराळ संस्थेच्या यादीत शीर्षस्थानी पोहचेल.
भारताचे स्पेस स्टेशन कसे असेल?
भारताकडून बांधल्या जाणाऱ्या स्पेस स्टेशनचे वजन २० टन असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे वजन सुमारे ४५० टन आणि चिनी स्पेस स्टेशनचे वजन सुमारे ८० टन असेल. ४-५ अंतराळवीरांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने ते तयार करण्याची इस्रोची योजना आहे. हे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केले जाईल. याला LEO म्हणतात जे अंदाजे ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
२०३० पर्यंत स्वप्न पूर्ण होईल
भारताच्या स्पेस स्टेशनची घोषणा २०१९ मध्ये ISRO चे अध्यक्ष के सिवन यांनी केली होती. गगनयान मोहिमेनंतर भारत २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करेल, असेही सांगण्यात आले. वास्तविक गगनयान मिशन हा त्याचा पहिला टप्पा आहे. ज्यामध्ये अंतराळवीरांना पृथ्वीपासून ४०० किलोमीटर दूर असलेल्या LEO कक्षेत पाठवले जाईल. गगनयान मोहिमेपर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याची भारताची योजना आहे. विशेष म्हणजे स्पेस डॉकिंगसारख्या तंत्रज्ञानावर संशोधनासाठी भारत सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर या आशेला आणखी बळ मिळाले. हे तंत्रज्ञान अवकाश स्थानकांमध्ये वापरले जाते.
अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देणार
भारताचे अंतराळ स्थानक तयार होण्यापूर्वीच अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देईल. यासाठी नासा आणि इस्रो यांच्यात करारही झाला आहे. २०२४ मध्ये भारतातील दोन अंतराळवीर देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकतात. याआधी त्यांना अमेरिकेतील ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी व्हाईट हाऊसने निवेदन ही जारी केले आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे, चांद्रयान-३ मधील माहिती या मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल आणि नासा भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहण्याचे प्रशिक्षण देईल. याशिवाय केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही आपल्या वक्तव्यात गगनयान मोहिमेनंतर अंतराळवीर प्रशिक्षणासाठी जातील असे सांगितले होते.
स्पेस स्टेशन म्हणजे काय?
स्पेस स्टेशन हे अंतराळातील एक ठिकाण आहे जिथे शास्त्रज्ञ राहतात आणि विविध प्रकारचे संशोधन करतात. हे स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरत असते.साधारणपणे एका अंतराळवीराला येथे ६ महिने राहावे लागते, त्यानंतर दुसरी टीम पाठवली जाते आणि पहिली टीम परत येते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रत्येक वेळी किमान ७ अंतराळवीर असतात, कधीकधी त्यांची संख्या वाढते. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक १५ देशांनी संयुक्तपणे तयार केले आहे. यामध्ये नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनेडियन स्पेस एजन्सी, जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि रशियाची रोसकॉसमॉस हे प्रमुख आहेत. पूर्वी हे २०२४ पर्यंत चालत असे, परंतु अलीकडे नासाने २०३० पर्यंत वाढवले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.