राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार!

    11-Sep-2023
Total Views |
Rajasthan Congress leaders Jyoti Mirdha, Sawai Singh Choudhary join BJP

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे आणखी एक नेते, निवृत्त आयपीएस सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.या दोन्ही नेत्यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. राज्यातील काँग्रेसला हा दुहेरी धक्का प्रियंका गांधी यांच्या रॅलीनंतर अवघ्या एका दिवसात बसला आहे. दरम्यान प्रियंका गांधींनी १० सप्टेंबर रोजीच राजस्थानमधील टोंक येथे एका सभेला संबोधित केले होते.

ज्योती मिर्धा या राजस्थानचे ज्येष्ठ जाट नेते नथुराम मिर्धा यांची नात आहे. नथुराम हे नागौरचे खासदारही राहिले आहेत. एकूण ६ वेळा ते खासदार आणि ४ वेळा आमदार होते. जाटांमध्ये मिर्धा कुटुंबाचा अनेक दशकांपासून मोठा प्रभाव आहे. ज्योती राजस्थानातील मारवाड भागातील आहे. या प्रदेशात नागोर व्यतिरिक्त, बारमेर, जोधपूर, पाली आणि जालोर जिल्ह्यांच्या जागांवरही मिर्धा घराण्याचा प्रभाव आहे.

२००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकून ज्योती मिर्धा खासदार झाल्या. मात्र २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये, त्यांचा RLPA अध्यक्ष आणि NDA उमेदवार हनुमान बेनिवाल यांनी पराभव केला. मात्र आता आरएलपीए आणि भाजपची युती तुटली आहे. अशा स्थितीत भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होते.

ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचा शोध पूर्ण झाला आहे. एकीकडे ज्योती यांचा विधानसभेत जाट नेता म्हणून वापर करून भाजप जाट व्होटबँकेला हात घालू शकते. त्याचबरोबर विधानसभेत काँग्रेसविरुद्ध लढून ते आपली स्थिती मजबूत करू शकतात. ज्योतीचा भाजप प्रवेश हा हनुमान बेनिवाल यांच्यासाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो. बेनिवाल यांनी युती न करता एकट्याने निवडणूक लढवली तर त्यांचा मार्ग सोपा नसेल.

दरम्यान मिर्धा कुटुंबातील इतर नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.ज्योती मिर्धा भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आता मिर्धा कुटुंबातील अन्य नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये मोठे नाव आहे ज्योतीचे चुलत भाऊ देगानाचे आमदार विजयपाल मिर्धा. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योती मिर्धा म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात आहे. गेहलोत सरकारच्या काळात राजस्थानची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान राजस्थानचे माजी डीआयजी आणि निवृत्त आयपीएस सवाई सिंह चौधरी यांनीही ज्योती मिर्धा यांच्यासह भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. २०१८ मध्ये त्यांनी राजस्थानच्या खिनवसार विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.