मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ यांच्यासहित प्रितेश रोटकर, विनय महालकर यांना मुरूड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण जमीन मालकीची असल्याचे भासवून या तिघांनी विक्री केली होती. सरकारी जागेची विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या १९ बंगल्यांच्या चौकशीदरम्यान कोर्लई ग्रामपंचायतीमधील अन्य मिळकतीची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार झालेल्या चौकशीत हे प्रकरण उघडकीस आले आहे. अलिबाग उपविभागीय अधिकारी अरुण भोर यांनी तपासादरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास ही अटक केली आहे.