मुंबई: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १४वा दिवस आहे. सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगेंची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात आहे. मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. अध्यादेशात अपेक्षित बदल केला जात नाही तोवर आमरण उपोषण सुरूच राहील अशी त्यांची भूमिका आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागणीबाबत आज सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सरकार आणि विरोधी पक्ष मिळून आरक्षणाच्या प्रश्नावर आपले मतं मांडतील. दरम्यान, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाष्य केले आहे. त्यामुळे आता कोणता निर्णय समोर येणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे.
राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ते म्हणाले, "ही लढाई फक्त मनोज जरांगे पाटील यांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यासाठीच मी पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. मराठ्यांचं जगणं आणि मरणं हे दोन्ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र वर्षानुवर्ष नुकसानीची शेती केल्याने आज मराठा समाजाची ही अवस्था आहे. तर काही शुक्राचार्य आडकाठी आणतात कोर्टात जातात. एखादा समाज मागे पडलेला असेल त्याची दुरावस्था झाली असेल त्यामुळे आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण नाही मिळालं तर हा समाज सोडणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या, जे काही त्याच्या हक्काचं आहे ते द्या. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत काळजी घ्यावी, असा योद्धा आम्हला गमवायचा नाही ,तब्येतीला जपा." असं राजू शेट्टी जरांगेंना म्हणाले.