एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणत 'सवर्ण उद्योजक एकतेचा ' डोंबिवलीत निर्धार

महाराष्ट्र शासनाचा अमृत प्रकल्प घडवणार १२००० हून अधिक खुल्या प्रवर्गातील उद्योजक

    11-Sep-2023
Total Views |

Dhruv
 
 
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणत 'सवर्ण उद्योजक एकतेचा ' डोंबिवलीत निर्धार
 

महाराष्ट्र शासनाचा अमृत प्रकल्प घडवणार १२००० हून अधिक खुल्या प्रवर्गातील उद्योजक

 
मोहित सोमण
 

डोंबिवली: गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर्माण केलेली योजना आहे. व्यवसायासाठी मानसिकता तयार करण्यापासून, भांडवल मिळवण्यात मदत, अर्थसहाय्य, व्यवसाय निवडीपासून ते व्यवसाय हातभार लागेपर्यंत, याशिवाय व्यवसाय यशस्वी झाला का यांच्या पाठपुराव्यातून ८००० हून अधिक उद्योजक निर्माण करण्याचे शिवधनुष्य अमृत योजनेने स्विकारल आहे. याखेरीज तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाला जोडणे, याशिवाय नुसतेच उद्योजक न बनवता लाभार्थींनी अजून नवे उद्योजक बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात आहे. रविवारी सकाळी डोंबिवली येथील ब्राह्मण सभेत या विचारमंथनाचा कार्यक्रम पार पडला.
 
 
 
एकमेकांचे पाय न खेचता समाजाचे राष्ट्रीय विचार व संस्कृतीशी जोडणे व उद्योजक करून समाज संपन्न करणे असा हा बहुउद्देशीय प्रकल्प असेल. ब्राह्मण, मराठा, सीकेपी अशा काही समाजाचे खुल्या प्रवर्गात प्रतिनिधित्व मोडते. जवळपास एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के समाज हा परंपरागत सधन मानला जातो. परंतु जागतिकीकरणा नंतर यातही एक मोठा वर्ग आरक्षणाचा कक्षेत येत नसल्याने गुणवत्ता असूनही फक्त सवर्ण म्हणून मागे राहिला. परंतू आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक पातळीवर सक्षम करण्यासाठी ध्रुव IAS चे संस्थापक डायरेक्टर श्री विनोद देशपांडे व अमृत योजनेच्या स्वयं रोजगार प्रकल्पाचे डायरेक्टर श्री भूषण धर्माधिकारी यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र शासनातील अतिरिक्त उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. त्यातून या प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यामुळे इच्छाशक्ती असताना गतीही मिळाली. प्रामुख्याने अर्थसहाय्य, प्रशासकीय कौशल्य व मनुष्यबळ यांच्यात सांगड घालून अनेक ' अप्रत्यक्ष ' हातांची मदतही मिळाली.
 
 
 
महाराष्ट्र शासनाच्या अमृत योजनेचा श्रीगणेशा आज डोंबिवलीत झाला.अनेक मान्यवरांचा उपस्थितीत या कार्यक्रमात अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नावर चर्चा झाली.तत्वज्ञानापलीकडे शाश्वत सत्य जाणून घेण्याचा दूरगामी विचार या उद्योजक निर्मिती निमित्त ऐरणीवर आला आहे.
 
 
 
गरजूंना जात धर्म नसतो हे अतिशय सत्य असले तरी मात्र सर्वणांना देखील चरितार्थ चालवायला मदत लागते याचाच अर्थ सांस्कृतिक राष्ट्रवादाला थोडासा ' डेंट' लागला तो का लागला हा संशोधनाचा विषय आहे.या 'अमृत ' प्रकल्प योजनेतून २०० तालुक्यातील पाडया वस्त्यांतील तरूणांना ' पिन टू पियानो ' सपोर्ट करणे किती महत्वाचे यावर या कार्यक्रमात चर्चा झाली.विविध उद्योजक, व्याख्याते, आणि या प्रकल्पांचे प्रणेते यांच्या परिसंवादातून फक्त योजनाच नाही तर तज्ज्ञांचे यात कशी सुधारणा व योजना आखता येतील याविषयी सल्लेही घेण्यात आले.कुठलाही प्रश्न तडीस नेण्यासाठी संवाद व अभिप्राय हे सुसुत्र काही येते.
 
 
 
श्री विजय जोशी,श्री विनोद देशपांडे,श्री भूषण धर्माधिकारी यांच्या बरोबरच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक श्री सच्चिदानंद शेवडे यांचेही भाषण झाले.सी ए पराग प्रभुदेसाई,सीएस सागर कुलकर्णी, उद्योजक गिरिश टिळक,उद्योजिका सायली मुतालिक, उद्योजिका प्रार्थना बाळंखे,उद्योजक व समाज कार्यकर्ते श्री विश्वजीत देशपांडे,ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह संचालक अरविंद कोऱ्हाळकर,आयटी एक्स्पर्ट व उद्योजक तंत्रग्यान कंपनीचे रवींद्र वारंग,अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.भारतीय संस्कृती आणि व्यापार यांचे घनिष्ठ नात ते आताची बदललेली संस्कृती यावर अभ्यास करताना व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञान व देशाभिमुख सेवाभावी तरुणांची फळी घडवणे यावर या कार्यक्रमात परियोजना सांगत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 
 
 
एखाद्या सवर्ण उद्योजकाला कर्ज देण्यासाठी मदतीचा हात देतानाच उद्योग कसा निवडावा त्यातील बारकावे,तज्ञांचे मत, मुद्दल व्याज फेडताना आपला Attitude कसा असावा, नियोजनातून 'वेल्थ' निर्मितीसाठी यात मान्यवरांनी विविध मुद्दे उपस्थित केले. अगदी भिक्षुकाला ' पुरोहित ' किंवा ' पौरोहित्य ' सन्मानजनक म्हणा असा सल्ला श्री सागर कुलकर्णी यांनी दिला. त्यांच्याही सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात हा त्यामागील मुद्दा श्री गिरीश टिळक यांनी विषद केला.
 
 
 
श्री विश्वजीत देशपांडे यांनी व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाचे वय लक्षात घेऊन त्याप्रमाणे पूर्व योजना 'अमृत' च्या माध्यमातून विचारात घ्यायला पाहिजेत हा मोलाचा सल्ला दिला. या व्यतिरिक्त श्री सायली मुतालिक यांनीही आपले कार्यालय अमृतचा स्वयंसेवकाला वापरण्यासाठी व शक्य ते सहकार्यासाठी आश्वासन दिले.आपले सहकार्य व पाठिंबा व्यक्त करतानाच वेळ काढून आज सी ए पराग प्रभुदेसाई ,व सी एस सागर कुलकर्णी यांनी तांत्रिक कायदेशीर, ट्रेडमार्क, फायनान्शिअल बाबतीत काळजी कशी घ्यावी यासाठी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
 
 
संपूर्ण महाराष्ट्रात अमृत उपक्रमाचे ८० स्वयंसेवक प्रत्यक्ष फिरून तरूणांना मदत करणार आहेत. कृषी, व्यवसाय इतर सेवा क्षेत्रातील उदयोग असे १२००० हून अधिक व्यवसायिक किंवा रोजगार बनवण्यासाठी ध्रुव आय ए एस अकादमीच्या देशपांडे व प्रोजेक्ट डायरेक्टर भूषण धर्माधिकारी यांनी लक्ष ठरवले आहेत. ' धंदा तुला जमायचा नाही ' ही नकारात्मक मानसिकता विसरून हो ' तूच धंदा करू शकशील ' या मानसिकतेत आणायचे व्यवहारात कठीण असले तरी तिथपासून सुरूवात करून त्या उद्योजकाला उद्योगातही साथ देणे यासाठी ही टीम काम करत आहे.
 
 
 
मुख्य म्हणजे याचे कुठलेही शुल्क आकारले जात नाही. याखेरीज श्री प्रतिक गाडे हे रिक्रुटमेंट संकेतस्थळ बनवून नोकरी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजक, मनुष्यबळ यांची यावेळी कनेक्टिव्हिटी करून देणे यासाठी स्कील डेव्हलपमेंट सहाय्य या योजनेत आहे. एक मोठी आयटी टीम यामागे कार्यरत आहे. या टीमला समाजाकडूनही या स्तुत्य उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा दिला जावा यासाठी मोठ्या स्तरावर मागणी होत आहे.
 
 
 
वाटेल ती मदत एकमेकांना करणे आणि सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी आपल्या मराठीतही म्हण आहे ' एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या संत तुकाराम महाराजांच्या चपखल विचारांनी समाजभान जपणे ही जनतेची जबाबदारी असल्याने या उपक्रमाला भविष्यात किती प्रतिसाद मिळेल यातूनच पुढील योजनांना पाळबळ मिळेल हे मात्र नक्की.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.