मुंबई : ''मराठा आरक्षण प्रश्नावर झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एक ठराव संमत केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या ज्या मागण्यांसाठी काम करत आहेत, त्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला काम करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात यावा आणि मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असा ठराव सर्वपक्षीयांच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे,'' अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
''सरकारने आरक्षण प्रश्नी स्थापन केलेल्या समितीत मनोज जरांगे पाटील यांनी सहभागी व्हावे किंवा आपला एखादा तज्ज्ञ प्रतिनिधी यात सहभागी करावा, अशी आमची विनंती आहे. मराठा आरक्षण आंदोलनात ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून लाठीचार्ज प्रकरणात सहभागी असलेल्या एकूण ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले असून त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत,'' अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सरकारची आरक्षण प्रश्नावर भूमिका स्पष्ट असून तज्ञांसोबत चर्चा करून टास्क फोर्स स्थापन करून कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना तीन प्रस्ताव देऊनही अद्याप आंदोलन मागे घेण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांकडून आरक्षणावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे इत्यादी उपस्थित होते.