मुंबई: आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधुभावाने राहावे. सर्व जात, पात, धर्म विसरून दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी येथे केले. विकासासाठी कधीही एवढा निधी मिळाला नाही तो आताच्या युती सरकारने दिला आहे. काळजी करू नका, कोणतेही विकासाचे काम थांबणार नाही. लोकांचे प्रेम तुमच्यावर आहे. सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. असं फडणवीस राणा दाम्पत्यांना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "अमरावती विमानतळाचा विकास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. पीएम टेक्सटाईल पार्कअंतर्गत नव्या टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार असून, यातून तीन लाख तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
"एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे, ही घटना अमरावतीच्या शिक्षण परंपरेला दृढ करणारी आहे. तसेच अमरावतीचे श्रद्धास्थान तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे स्मारक तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीचा सर्वांगीण विकासासाठी या निर्णयांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील." असं फडणवीस यावेळी म्हणाले.