नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराविषयी अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देव सद्बुदधी देवो, असा टोला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी लगाविला आहे.
माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे पिता बाळासाहेब ठाकरे हे अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या आंदोलनात सक्रिय होते. त्यांचे या आंदोलनातील योगदान संपूर्ण देशाने बघितले आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकून तेदेखील “माझ्या मुलाला हे झाले तरी काय” असे म्हणत असतील. सध्या ठाकरे ज्या आघाडीचा घटक आहेत, ती आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी कोणत्याही थरास जाऊ शकते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलास सद्बुद्धी लाभो, अशी केवळ प्रार्थनाच आपण करू शकत असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीदेखील ‘एक्स’वरून ठाकरे यांच्या वक्त्यास प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आज बाळासाहेब (शिवसेनेचे दिवंगत संस्थापक आणि उद्धव ठाकरेंचे वडील) असते तर त्यांनी नक्कीच “सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे आज काय करत आहेत", असा विचार केला असता. सत्तेच्या हव्यासापोटी काही लोक आपली विचारसरणी विसरले आहेत. सनातन धर्माबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, मात्र राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी त्यास विरोध दर्शविलेला नाही. यावरून त्यांची विचारसरणी कळते, असे ठाकूर यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, जळगाव येथील एका जाहिर सभेत रविवारी ठाकरे यांनी "येत्या काही दिवसांत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी देशभरातून अनेक हिंदूंना बोलावले जाण्याची शक्यता आहे आणि समारंभ संपल्यानंतर लोक परत येतील तेव्हा ते गोध्रा घटनेसारखे काहीतरी करू शकतात", असा दावा केला होता.