नवी दिल्ली : सरकारी आरोग्य योजना समाजातील अखेरच्या घटकापर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालय ‘आयुष्मान भव’ कार्यक्रम सुरू करणार आहे. या योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी म्हणजे १७ सप्टेंबरपासून होईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले, या वर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक इच्छित लाभार्थीपर्यंत सर्व सरकारी आरोग्य योजनांची जास्तीत जास्त वितरण सुनिश्चित करण्यासाठी 'आयुष्मान भव' कार्यक्रम सुरू करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून ६० हजार लोकांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत आरोग्य सेवा आणि कार्यक्रम सुधारण्यासाठी या कार्यक्रमाचा आणखी विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त क्षयरोगाच्या (टीबी) निर्मुलनावर भर दिल्याचे केंद्रीय मंत्री मांडविया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जगाने क्षयरोग निर्मूलनासाठी २०३० सालचे लक्ष्य ठेवले असले तरी पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी २०२५ सालचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी सुमारे ७० हजार लोक नि-क्षय मित्र बनले आणि क्षयरोगाचे रुग्ण दत्तक घेतले. आता या नि-क्षयमित्रांची संख्या एक लाख झाली आहे. नि-क्षय मित्र ही योजना यशस्वी होत असून त्यामध्ये एनजीओ, राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रदेखील योगदान देत असल्याचे मांडविया यांनी यावेळी नमूद केले आहे.