आत्मनाशाचे बळी

    11-Sep-2023
Total Views |
Article On Weak Mental Health Mattered In Suicide

मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थांच्या गैरवापराच्या विकारांमुळे किंवा आत्महत्येच्या विचारांशी संबंधित कलंकामुळे मदत घेण्याची इच्छा नसेल, तर तो जोखमीचा घटक आहे. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना’च्या अनुषंगाने जगभरात आत्महत्या रोखण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याविषयी...

दोन दिवसांपूर्वीच ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ पाळण्यात आला. त्या अनुषंगाने जगभरात आत्महत्या रोखण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. जगभरात आत्महत्या ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे ज्याचा व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर दीर्घकाळ घातक परिणाम होऊ शकतो. त्याची कारणे गुंतागुंतीची आणि अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जात असताना, आत्महत्येमागे एकच कारण नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. आत्महत्या बहुतेकदा तेव्हा होते, जेव्हा तणाव आणि आरोग्याच्या समस्या एकत्रितपणे व्यक्तीमध्ये घोर निराशा आणि दारूण अनुभव निर्माण करतात. आपण सगळेच जाणतो की, नैराश्य ही आत्महत्येशी निगडित सर्वात सामान्य स्थिती आहे आणि तिचे अनेकदा निदान होत नाही किंवा झाले तरी त्यावर योग्य वेळी उपचार घेतला जात नाही. उदासीनता, चिंता आणि व्यसनजन्य पदार्थांच्या समस्यांसारख्या परिस्थिती, विशेषतः लक्ष न दिल्यास, आत्महत्येचा धोका अधिक वाढतो, तरीही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, बहुतेक लोक जे त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती सक्रियपणे सांभाळतात, ते जीवनात समाधानी असतात.
 
काही असे जोखीम घटक अस्तित्त्वात आहेत, ज्यामुळे लोकांना आत्महत्येचा धोका जास्त असतो. एकाच जोखीम घटकाच्या उपस्थितीचा अर्थ असा नाही की, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येचा धोका जास्त असतो. परंतु, अनेक जोखीम घटक एकत्रितपणे आत्महत्येच्या होण्याचे संकेत देतात. याव्यतिरिक्त नैराश्य किंवा बायपोलर डिसऑर्डर, मादक द्रव्यांचे सेवन, गंभीर शारीरिक आजार इत्यादी जोखीम घटकांच्या संयोगाने, एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येचा धोका लक्षणीयरित्या वाढते. आत्महत्येचे जोखीम घटक हे सूचित करतात की, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येचा धोका इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असतो. एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी, इतिहास, पर्यावरण आणि/किंवा परिस्थितींशी संबंधित काही समस्या जे आत्महत्येच्या वर्तनाची जोखीम किंवा संभाव्यता वाढवतात.

आपण सर्वच तसे पाहिले, तर आयुष्यात अनेक दुदैवी गोष्टी आणि जोखीम घटक अनुभवत असतो. जोखीम घटकांचा अनुभव घेतल्याचा अर्थ असा होत नाही की, एखादी व्यक्ती स्वतःचा जीव घेण्याचा विचार करेलच किंवा प्रयत्न करेलच. प्रत्येकाकडे दुष्कर आव्हानांचा सामना करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि ठाम, कणखर व्यक्तिमत्त्व, मजबूत कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक कनेक्शनदेखील कठीण किंवा नकारात्मक जीवनातील समस्यांना संतुलित करण्यास वेळोवेळी मदत करतात.

आत्महत्या रोखण्याचे उद्दिष्ट सोपे आहे. आत्महत्येची जोखीम वाढवणारे घटक कमी करा आणि लवचिकता वाढवणारे घटक (म्हणजे संरक्षणात्मक घटक) वाढवा. तद्वतच, प्रतिबंध प्रभावाच्या सर्व वैयक्तिक, नातेसंबंध, समुदाय आणि सामाजिक स्तरांना संबोधित करा. आत्महत्येबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सामाजिक बदलासाठी वचनबद्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक धोरणे आवश्यक आहेत. जोखीम घटक ही आत्महत्येशी संबंधित अशी वैशिष्ट्ये आहेत- जी थेट कारणे असू शकतात किंवा नसू शकतात.

आत्महत्येसाठी मुख्य जोखीम आणि संरक्षणात्मक घटक कोणते आहेत?

संशोधकांनी शेकडो नाही, तर डझनभर जोखीम आणि संरक्षणात्मक घटक ओळखले आहेत. आत्महत्येसाठी सर्वात सामान्य प्रमुख जोखीम आणि संरक्षणात्मक घटक या लेखात सूचीबद्ध केले आहेत. आत्महत्येसाठी प्रमुख जोखीम घटकांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो आत्महत्येचा पूर्वी केलेला प्रयत्न हा महत्त्वाचा जोखीम घटक आहे. व्यसन, मनोविकार, प्राणघातक साधन जसे की कीटकनाशक किंवा विष जवळपास असणे. संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यामध्ये आत्महत्येमुळे मृत्यू होण्याचा धोका ३८ पट जास्त होता. ज्यांनी दारूचा गैरवापर केला होता, त्यांना आत्महत्येमुळे मृत्यू होण्याचा धोका ज्यांनी दारूचे व्यसन नव्हते. त्यांच्यापेक्षा सहा पट जास्त होता. याशिवाय ज्यांचा आत्महत्येचा कौटुंबिक इतिहास आहे. लहानपणी बालशोषण झाले आहे, लैंगिक अत्याचार झाले आहेत किंवा कौटुंबिक दुर्लक्ष झाल्याचा इतिहास दिसून आला आहे, मानसिक आरोग्य विकारांचा इतिहास, विशेषतः नैराश्याचा आजार, अल्कोहोल आणि पदार्थांचे व्यसन आहे, हताशपणाची भावना, मानसिक आवेग किंवा आक्रमकता, समाजातून एकटे पडण्याची भावना व अलगाव, इतर लोकांपासून दूर जाण्याची भावना, मानसिक आरोग्य उपचार करण्यात अडथळे, गंभीर शारीरिक आजार, आर्थिक तोटा आणि कर्ज, नोकरी नसणे किंवा ती सुटणे, हे जोखमीचे सर्वश्रुत घटक आहेत.

मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थांच्या गैरवापराच्या विकारांमुळे किंवा आत्महत्येच्या विचारांशी संबंधित कलंकामुळे (Stigma) मदत घेण्याची इच्छा नसेल, तर तो जोखमीचा घटक आहे. वैद्यकीय अभ्यास दर्शवितात की, मादक पदार्थ व्यसनविकार असलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्या मृत्यूचा आजीवन धोका सामान्य लोकसंख्येच्या (तीन ते पाच टक्के) जोखमीपेक्षा पाच ते दहा पट जास्त आहे. अल्कोहोल वापर विकार असलेल्या लोकांमध्ये आत्महत्येने मृत्यू होण्याचा धोका सर्वसामान्य लोकांमध्ये अपेक्षित असलेल्या धोक्याच्या दहापट आहे, तर अफूच्या वापराच्या विकाराने मृत्यू होण्याचा धोका १४ पट जास्त दिसून येतो.

आत्महत्या ही वैयक्तिक समस्येचे उदात्त निराकरण आहे, असा विश्वास किंवा सांस्कृतिक आणि धार्मिक समजुती असतील, तरी त्या समाजात आत्महत्या जास्त होताना दिसतात. अर्थात कुठलाही धर्म आणि समाज आत्महत्या उदात्त मनात नाही. (क्रमशः)

डॉ. शुभांगी पारकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.