महाराष्ट्र : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणाची सर्व पातळी सोडली असून त्यांना यापुढे जाहीरसभेतून 'घरकोंबडा' म्हणावं लागेल असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच, उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हपापले होते आणि आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका भाजप सहन करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी कायम महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला असून तुमच्या सारखं ‘घरकोंबडा‘ बनून केवळ मातोश्रीची रखवाली केली नाही. तसेच, तुम्ही स्वार्थासाठी सोनिया गांधींपुढे मुजरा केला पण फडणवीसांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नसल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर कोविडमध्ये महाराष्ट्र झुंजत असताना तुम्ही ‘घरकोंबडा‘ होऊन फेसबुक लाईव्ह करत होतात. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात जाऊन लोकांना धीर देत होते, असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणाले, सत्तेत असो की विरोधात फडणवीसांनी कायम जनहिताचा विचार करतात. तुम्ही मात्र सत्तेत असताना शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. सत्ता असताना तुम्हाला कधी जळगाव दिसलं नाही. आज मात्र सत्ता गेल्यामुळे जाग आली. पण लक्षात ठेवा जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.