नाशिक शहरात गेली दोन दशके गोदावरीला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी व्यापक जनचळवळ उभी राहिली आहे. विसर्जनाच्या दिवशी नदीमध्ये ‘पीओपी’ वा शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात नाही, तर मूर्ती संकलन केले जाते. महापालिका आणि शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थाकडून राबवल्या जाणारे मूर्ती संकलन कमालीचे यशस्वी होत आहे. ‘श्रीं’च्या मूर्ती कृत्रिम तलाव किंवा नदीत तीन वेळा विसर्जित करून त्यांना पुन्हा पाण्यातून काढत, त्यांचेही संकलन केले जाते. ‘पीओपी’च्या मूर्ती नदीत विसर्जित केल्याने प्रदूषण होतेच होते. परंतु, शाडू मातीच्या मूर्तीची मातीही नदीपात्रातील मातीत मिसळून काही अंशी प्रदूषण होतेच. कारण, शाडू मातीही अत्यंत चिवट असते. त्यामुळे नदीच्या ‘जीन बँक’ पारिस्थितीकीला धोका पोहोचतोच! कृत्रिम तलावात किंवा नागरिकांच्या घरी शाडू मातीची गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर निर्माल्याप्रमाणे उरलेली मातीचे करायचे, काय हा प्रश्न असतो, यावर उपाय म्हणून नाशिकमधील ‘निसर्गायन’ आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ यांनी स्तुत्य उपक्रमांचे नियोजन केले आहे. या दोन संस्थांतर्फे विसर्जनाच्या दिवशी शहरात दहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. तेथे ‘श्रीं’च्या विसर्जनानंतर संकलित झालेली शाडू माती मूर्तिकारांना मोफत भेट देण्याचा अभिनव उपक्रम यंदा प्रथमच शहारात राबवला जातोय. तो स्तुत्यच. या उपक्रमामुळे गेली दोन दशके शहरात साजर्या होणार्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिकच बळ मिळणार आहे.‘निसर्गायन’ आणि ’ग्रंथ तुमच्या दारी’ या संस्थांची शहरात गंगापूररोड, महात्मानगर, द्वारकाजवळील काठे गल्ली, रोटरी क्लब परिसर नवीन नाशिक ‘सिडको’तील काही वसाहती, सातपूर, नाशिक रोड, चोपडा लॉन्स यांसह अन्य काही ठिकाणी अनंत चतुर्दशीला मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रावर संकलित होणार्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करून, त्यानंतर संकलित झालेली शाडू माती शहरातील मूर्तिकारांना मोफत वाटली जाणार आहे. एकूणच हा नियोजित उपक्रम गोदामाईच्या प्रदूषण मुक्तीसाठी नक्कीच हातभार लावणारा तसेच शाडूमातीचा पुनर्वापर करणारा ठरणार असल्याने अनुकरणीयच!
नाशिक शहरातील खड्डे प्रश्न म्हणजे कधीही न संपणारी ‘कहाणी.’ पावसाळा आणि नाशिकमधील खड्डे हे समीकरणच झाले असताना, नागरिकांनी खड्ड्यांच्या डागडुजीसाठी आवाज उठवला. लोकप्रतिनिधी आणि नाशिकच्या मंत्रिमहोदयांनी खड्ड्यांबाबत प्रशासनाला खडे बोल सुनावत शहरातील खड्ड्यांची डागडुजी करावी, असे निर्देश दिले. त्यानंतर नाशिकमधील महापालिकेच्या सहाही विभागातील खड्ड्यांची दर्जाहीन डागडुजीही करण्यात आली. मात्र, २१ दिवसांनंतर शहरात कोसळणार्या पावसात पुन्हा शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यांत गेल्याचे चित्र. शहरात आज एकही असा रस्ता उरला नाही, ज्यावर खड्डे नाहीत. रस्त्यांची चाळण झाली असताना, गेल्या महिन्यातील दि. १० ऑगस्टला स्थायी समितीने १०४ कोटी रुपये खर्चाच्या डागडुजीसाठी हिरवा कंदिल दिला. मात्र, नाशिकचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्याकडून हा प्रस्ताव एक महिना उलटल्यानंतरही नगरविकास खात्याकडे मंजुरीकडे गेला नसल्याचे भयंकर वास्तव! यामुळे बांधकाम विभागाला ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देता आला नाही. त्यात २१ दिवसानंतर शहरात कोसळत असल्याने पावसाने रस्त्यांची दैना उडाली. संपूर्ण रस्ते खड्ड्यांत गेल्याने प्रशासानवर प्रचंड टीकेची झोड उठवली गेली. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच नाशिकमधील कवींनी गतवर्षी नाशिकचे खड्डे, यावर काव्यसंमेलनही भरवले. प्रशासनाचे इतके वाभाडे निघाल्यानंतर यंदाही पालिकेच्या आयुक्तपदाच्या खुर्चीचा खेळ रंगला. काही दिवस पालिका आयुक्ताविना राहिली. त्यात रस्त्यांचा प्रश्न मागे पडला. नंतर जनरेट्यामुळे आणि नाशिकच्या मंत्र्यांनी रस्त्याच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून, ते दुरुस्त करावे, असे निर्देश दिल्यानंतर १५ दिवसांपूर्वीच शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचा ’फार्स’ केला गेला. आता गेली तीन दिवस कोसळणार्या पावसाने, हे डागडुजी केलेले रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. शहरातील खड्ड्यांमध्ये टाकलेल्या पेव्हर ब्लॉकजवळील मुरूम वाहून गेल्याने वर येऊन विस्कळीत झाले. मखमलाबाद रोड, पंचवटीसह शहरातील काही ठिकाणी, तर रस्ते खोदून पेव्हर ब्लॉकची झोळणी झालीये. हे सर्व बघता ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या म्हणीचा प्रत्यय नाशिककरांना येतोय. नाशिककरांच्या नशिबी ‘खड्डेमुक्त रस्ते’ स्वप्न राहणार आहे काय?
निल कुलकर्णी