अष्टपैलू संगीता....

    10-Sep-2023   
Total Views |
Article On Social Worker Sangeeta Vartak

संगीता वर्तक त्यांच्यातील आई, गृहिणी, ब्युटीशियन, सायकलिस्ट, परोपकारी व्यक्तिमत्व ते सामाजिक कार्यकर्त्या याबद्दल सांगणारा हा व्यक्तिपरिचय ...

अगदी चारचौघींसारखं आयुष्य. पती, दोन मुलं, त्यांच्या शाळा, डब्बे, अभ्यास आणि पार्लर. एकदिवस लेकीच्या काही मैत्रिणी घरी राहायला येणार होत्या. घरात पाहुणे यायचे असले की, काळजी आईलाच असते ना, त्यांची सतत धावपळ सुरू होती. त्यातच नुकत्याच पुसलेल्या फरशीवरून आईचा पाय घसरला. कोपराचे हाड मोडून हात प्लास्टरमध्ये गेला. हाडांचा चुरा झाल्याने त्यातून एक अ‍ॅल्युमिनियम वायर फिक्स केली होती. त्यानंतर फिजिओथेरपी सुरू झाली. या अत्यंत वेदनादायी काळात मानसिक स्थैर्य तरी कसे टिकेल? ‘कॅल्सिफिकेशन’चा त्रास सुरू झाला.

तो वेगळा आणि त्याच्या उपचारातून अ‍ॅल्युमिनियम वायरमुळे हाताची एक नर्व्ह दबली गेली. हाताची दोन बोटं काम करेनाशी झाली. अवघडलेपण, अगतिकता यांसगळ्या भावनिक आंदोलनांमुळे नैराश्य आलं. एकट्याने काय ते सहन करायचं! जवळ-जवळ सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वेदना कमी झाल्या. मानसिक स्थैर्यही मागवून आलं. आता हा मिळालेला नवा जन्मच. तो मात्र सत्कारणी लावायचा. केवळ कुटुंबाकडे लक्ष न देता, स्वतःसाठीही या जन्मात जगायचं, त्यांनी ठरवलं.

संगीता लहानपणापासूनच मस्तीखोर. उनाडायला, धावायला, खेळायला त्यांना आवडायचं. विरारजवळील आगाशी गावात त्यांचे बालपण गेले. शाळेत असल्यापासूनच जवळच्या मैदानात खो-खो खेळणं असायचं. खो-खोचा वेळ आवडता. हळूहळू कॉलेज संपलं आणि खो-खो सुटला. तेव्हा आगाशी म्हणजे खो-खोसाठी प्रसिद्ध. सर्व वयोगटांतील तरुण तरुणी खो-खोसाठी पुरापाडा मैदानावर जमत. माहिती, अनुभवासोबतच विचारांची देवाणघेवाण व्हायची. सोबतच शारीरिक मेहनतीमुळे कस लागत असे. व्यक्तिमत्त्व फुलून यायची, माणसं समृद्ध होत होती. पुढे सर्व आपापल्या नोकरी घरात व्यस्त झाले आणि मैदानाचा संपर्क सुटला. संगीतासुद्धा लग्न होऊन उमेळा गावात आल्या.

घर, मुले सांभाळताना त्यांचा दिवस जाऊ लागला. नाही म्हणायला त्यांनी स्वतःचे पार्लर सुरू केले. मधल्या काळात राजकीय वर्तुळातसुद्धा त्यांचा काही प्रमाणात वावर होता. त्या माजी उपसरपंचसुद्धा आहेत. पण, मुले जशी मोठी होऊ लागली. तशी त्यांना त्यांची चिंता लागून राहिली. आपली मुले वाईट वळणावर जाऊ नयेत, त्यांना वाईट संगत लागून चुकीच्या सवयी लागू नयेत, याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. याची त्यांना इतकी सवय झाली की, त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे पूर्णपणे सोडून दिले. संपूर्ण वेळ मुलांना काय हवे, मुलांचे कसे सुरू आहे, त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे, याकडे त्या पाहत असत.

हाताचे दुखणे सुरू असताना त्यांच्या लक्षात आले, आता मुले तर मोठी झाली, त्यांच्या विश्वात रममाण झाली. आयुष्य किती अप्रत्याशित असतं याची जाणीव होऊ लागली. मग त्यांनी ठरवले की आता पुरे, आता स्वतःकडे लक्ष द्यावे. सर्वप्रथम बाह्य रूप बदलले, जेणेकरून आत्मविश्वास येतो. छानसा हेअरकट केला. आपल्या दिसण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. थोडं-थोडं इंग्रजी बोलण्याचा सराव सुरू केला. लहानपणापासूनच गिटार शिकायची इच्छा होती, त्याचीही सुरुवात केली. योग वर्गात जाऊन योग सुरू केला. सायकल घेतली हातात आणि गिर्यारोहणालाही सुरुवात केली. इतका बदल स्वतःमध्ये त्या करून धजले, यावर त्यांचाही विश्वास बसत नसे. मग मात्र त्यांना आयुष्याची गंमत कळली आणि ‘सायकलिंग इव्हेंट्स’मध्ये त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली.

उमेळातील गणेशोत्सवातून प्रेरणा घेत त्या कलासक्त बनल्या. संगीता यांनी वारली चित्रकला शिकून घेतली. गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये तिचा उपयोग होऊ लागला. एक शेवटची राहिलेली इच्छा पूर्ण केली. ती म्हणजे सोलो ट्रिप. आणि मग त्यांना परिपूर्ण वाटू लागले. त्यांच्यात झालेला हा बदल इतरांनीही टिपायला सुरुवात केली होतीच. इतर मुलं त्यांच्या आईला सांगत, बघ तूसुद्धा संगीता काकीसारखं व्हायचा प्रयत्न कर. या दुसर्‍या आयुष्यात त्यांनी रक्तदान केले, ५०वा वाढदिवस विशेष करण्यासाठी कर्करोग ग्रस्तांना केसदान केले. आपला आनंद दानात आहे, हे ओळखून त्यांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला. अंगावरच काढून इतरांना देणं, यासाठी जे धैर्य लागतं, ते त्यांनी मिळवले. त्यांच्या सर्व निर्णयांत दोन्ही मुलांचा त्यांना नेहमीच आधार होता. त्यांच्या निर्णयाचे कौतुक व पुढील स्वास्थ्यपूर्ण आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.