पहिली जागतिक सर्वधर्म परिषद दि. ११ ते २७ सप्टेंबर १८९३ या कालावधीत अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या उद्घाटनाला आज १३० वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या स्वामी विवेकानंदांनी या परिषदेत जागतिक समुदायाला विश्व बंधुत्वाचा मौलिक संदेश दिला. असा हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे चिंतन...
'सर्वधर्म परिषदे’ला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, भारताच्या र्हासाची कारणे, भारताचे पुनरुत्थान कसे करता येईल, त्यासाठी कोणती साधने लागतील, यावर भरपूर चिंतन केले होते. अत्युच्च अशी आध्यात्मिक जाणीव पुन्हा जागृत करून आणि पुन्हा स्थापित करूनच भारताचे पुनरुत्थान होईल, असा निष्कर्ष विवेकानंदांनी त्या चिंतनातून काढला. पाश्चिमात्य देशात जाऊन भारतीय धर्म आणि संस्कृतीचा जगभर प्रसार करणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय त्यांनी, त्या चिंतनातून निश्चित केले. हे ध्येय गाठण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वधर्म परिषदे’त हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
ख्रिश्चन धर्म हाच खरा धर्म आहे. हे जगावर ठसविण्यासाठी खरे तर, त्या ‘सर्वधर्म परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत विवेकानंदांच्या अगोदर वेगवेगळ्या धर्मांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. प्रत्येकजण आपल्या भाषणात माझाच धर्म कसा खरा आणि श्रेष्ठ धर्म आहे, यावरच भर देत होता.
माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझाच धर्म खरा आहे, अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगल्यामुळेच मानव जातीच्या इतिहासात मोठे संघर्ष आणि हिंसाचार झाले आहेत. वर्ज्यक वृत्तीमुळे, म्हणजे इतरांशी मिळून मिसळून न वागण्याच्या वृत्तीमुळे जगात अनेक समुदायांचा संहार केला गेला आहे आणि आजही तो केला जात आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन न बाळगणार्या धर्मांचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. निसर्गात जशी विविधता आढळते. तशीच ती माणसांमध्येही आढळते. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, तिची मानसिकता ही वेगवेगळी असते. त्यामुळे ईश्वराची प्रार्थना करण्याचा मार्गदेखील एकच असू शकत नाही. त्यातही विविधता असणार, हे स्वाभाविक आहे.
‘सर्वधर्म परिषदे’त स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तीच मुळी अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो अशा साध्या शब्दांनी! त्यांच्या त्या साध्या शब्दातील प्रामाणिक संबोधनाचा श्रोत्यांवर खूपच प्रभाव पडला. विवेकानंदांचे ते भाषण खूपच गाजले. दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्यांचे वर्णन ’सर्वधर्म परिषदेचा अनभिषिक्त सम्राट’ या शब्दात करण्यात आले होते. परिषदेत स्वामी विवेकानंदांनी इतर सत्रातूनही भाषणे दिली. ‘माझा धर्म माझ्यासाठी योग्य आहे,’ असा दृष्टिकोन जर बाळगला, तर जगात शांतता नांदू शकते, यावर स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणांमधून भर दिला आहे. विवेकानंदांनी मांडलेला हा दृष्टिकोन सर्वसमावेशक असा आहे. संपूर्ण सृष्टी ही त्या परमेश्वराचेच प्रकटीकरण आहे आणि सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, ही त्याच परमेश्वराचे वेगवेगळे भाग आहेत, हे विवेकानंदांनी समजून घेतले होते. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, असा सर्वसमावेशक झाला होता.
प्रत्येकाने इतरांचा स्वीकार केला पाहिजे, सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांनीच हातभार लावला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी अंश आहे. हा दैवी भाव रुजल्यामुळे माणसाला मानवी समाजाच्या एकात्म अस्तित्वाची आणि बंधुत्वाची जाणीव होत असते. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या पाश्चात्य देशांमध्ये दिलेल्या विविध व्याख्यानांमधून स्वामीजींनी हाच संदेश पाश्चात्य जगाला दिला आहे. सनातन धर्माने किंबहुना भारताने हा संदेश अगदी प्राचीन काळापासून सार्या जगाला दिला आहे आणि यापुढेही तो देत राहणार आहे. आपल्या देशाच्या या उद्दिष्टाची आठवण स्वतःला आणि सर्वांना करून देण्यासाठी आपण दरवर्षीच्या दि. ११ सप्टेंबर रोजी ’विश्वबंधुत्व दिन’ रोजी साजरा करीत असतो.
भारतीयांना आणि भारतीयांच्या मनाला पूर्णपणे आणि कायमस्वरुपी गुलाम करण्यासाठी ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धती भारतीयांवर लादली. त्या शिक्षण पद्धतीत आपल्या धर्माच्या काही पैलूंची जाणीवपूर्वक खिल्ली उडविण्यात आली होती. उदाहरणार्थ-हिंदू हे मूर्तिपूजक असून, ते सैतानाची पूजा करतात. हिंदूंची भाषा अपरिपक्व आहे, ते जोपर्यंत इंग्रजी शिकत नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणे अशक्य आहे, हिंदूंनी आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तरच भारताचे रक्षण होऊ शकते. ख्रिश्चन धर्म हाच खरा एकमेव धर्म आहे, असे मुद्दे त्या शिक्षण पद्धतीत मांडण्यात आले होते. मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीतले, हिंदू धर्माची खिल्ली उडवणारे सर्व मुद्दे कसे चुकीचे आहेत, हे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी दाखवून दिले आहे. हिंदू माणूस मूर्तीची पूजा करत नाही, तर देवाची पूजा करतो आणि मूर्तीच्या पूजेतून तो देवाची अनुभूती घेतो. इतर धर्मीयदेखील एक किंवा अनेक प्रतीकांच्या माध्यमातून देवाची अनुभूती घेतात. श्रीरामकृष्ण परमहंसांनी ही गोष्ट त्यांच्या साधनेतून दाखवून दिली आहे.
श्रीरामकृष्ण परमहंसांनी येशू आणि अल्लाची प्रार्थना करण्याबरोबरच इतरही विविध साधना केल्या, तरीही ते ऋषी परंपरेने जोपासलेल्या हिंदू धर्मातच राहिले. येशू देवाचा पुत्र आहे; पण तो देवाचा एकमेव पुत्र नाही. हे त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक साधनेद्वारे जाणले. श्रीरामकृष्ण परमहंसांनी स्वतः ख्रिश्चन आणि मुस्लीम या वर्ज्यक धर्मांच्या साधना केल्या आणि त्यांचे सगळे दावे चुकीचे आहेत, हे सिद्ध केले. सर्व प्रकारच्या साधना केल्यानंतर श्रीरामकृष्ण परमहंस म्हणाले की, “हिंदू धर्म हाच सनातन धर्म आहे. आजकाल आपण ऐकत असलेले विविध पंथ परमेश्वराच्या इच्छेने अस्तित्वात आले आहेत आणि त्याच्याच इच्छेने, ते पुन्हा नाहीसे होतील. ते चिरकाल टिकणारे नाहीत. म्हणून मी म्हणतो, हिंदू धर्म नेहमीच अस्तित्वात आहे आणि राहील.“ श्री रामकृष्णांना सर्व साधनांमध्ये ईश्वरच दिसला. त्यांना सर्वोच्च अनुभूती प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी मूर्तीच्या माध्यमातून होणारी उपासना चालू ठेवली. एकदा का सत्याची जाणीव माणसाला झाली की, आजूबाजूच्या सर्वच गोष्टींमध्ये माणसाला ईश्वर दिसू लागतो.
श्रीरामकृष्ण परमहंसांनी ’काली’ ही देवता मूर्तिपूजेसाठी निवडली होती. तिचे भयानक रूप, अध्यात्माच्या बालवाडीत असलेल्यांना आणि लॉर्ड मेकॉलेसारख्या राजकारण्यांना सैतानासारखे उग्र वाटले. पण, श्रीरामकृष्णांनी आपल्या साधनेने ती अखिल विश्वाची माता आहे, हे जाणले होते. श्रीरामकृष्ण परमहंसांना इंग्रजी येत नव्हते, तरीही केशवचंद्र सेन, नरेंद्रनाथ दत्त यांच्यासारखे सुशिक्षित विद्वान ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्या चरणांपाशी बसले. प्राप्त होणारे अंतिम ज्ञान इंद्रियांच्या आणि भाषेच्या पलीकडे असते. शिवाय, ते नामाच्या आणि रुपाच्या तसेच काळ आणि अवकाशाच्याही पलीकडे असते, हे श्रीरामकृष्णांनी दाखवून दिले आहे. श्रीरामकृष्ण परमहंसांचा शिष्य असलेल्या स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म योग्यच आहेत. हे सर्वधर्म परिषदेत विशेषत्वाने सांगितले. त्यामुळेच तेथील श्रोत्यांवर विवेकानंदांचा चिरंतन, असा प्रभाव पडला.
‘सर्वधर्म परिषदे’त स्वामी विवेकानंदांनी केलेल्या व्याख्यानाविषयी‘नोबेल’ पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक व नाटककार रोमा रोलॉ म्हणतात की, “सोमवार, दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी परिषदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. पण, तो तरुण (विवेकानंद), जो कशाचेही प्रतिनिधित्व करीत नसूनही सर्वांचा प्रतिनिधी होता. तो कोणत्या संप्रदायाचा वा पंथाचा अनुयायी नव्हता, तर संपूर्ण भारताच्यावतीने बोलत होता. जमलेल्या हजारो लोकांचे लक्ष, त्याने वेधून घेतले. त्याचं बोलणं अग्नीप्रमाणे तेजस्वी होतं. त्या प्रकाशामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये आत्मचेतना जागृत झाली. इतर सर्व वक्ते आपल्या देवाबद्दल, आपल्या संप्रदायातील देवाबद्दल बोलले होते. तो एकटाच सर्व देवांबद्दल बोलला आणि वैश्विक अस्तित्वात, त्या सर्वांना स्थान असल्याचे सांगून त्याने सर्वांना आश्वस्त केले. सर्व बंधने तोडून टाकून स्वतः श्रीरामकृष्णच जणू आपल्या थोर शिष्याच्या मुखातून बोलत होते.
पुढील काही दिवसात तो दहा-बारा वेळा बोलला. प्रत्येक वेळी त्याने नव्या युक्तिवादाच्या आधारे पण तितक्याच ठामपणे, वेळ किंवा अवकाशाची मर्यादा न ठेवता, अतिशय रानटी व क्रूर अशा गुलामगिरीपासून ते आधुनिक विज्ञानाच्या सर्जनशील उदारमतवादी धोरणांपर्यंत सर्व मानवी मतांचा एकत्रित विचार करून आपला विश्वधर्माचा सिद्धांत मांडला. त्या सर्व मतांचा अशा प्रकारे संयोग साधला की, जेणेकरून सर्वांना त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार वाढ आणि विकास करून घेण्यास मदत होईल. माणसात अंतर्भूत असलेले देवत्व आणि त्याची उन्नती करण्याची अमर्याद क्षमता, याखेरीज दुसरी कोणतीही कट्टर मतप्रणाली असता कामा नये. या शक्तिशाली शब्दांचा प्रभाव प्रचंड होता. ‘सर्वधर्म परिषदे’च्या अधिकृत प्रतिनिधींच्या पलीकडे जाऊन ते आवाहन सर्वांपर्यंत पोहोचले. विवेकानंदांची कीर्ती एकाचवेळी परदेशात सर्वत्र पसरली आणि संपूर्ण भारताला त्याचा फायदा झाला.
स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्माचा आणि भारताचा अभिमान होता. ही गोष्ट त्यांनी ‘सर्वधर्म परिषदे’त जाहीरपणे सांगितली होती. परिषदेत ते केवळ हिंदू धर्माचे मोठेपण अधोरेखित करू शकले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. कारण, हिंदू धर्माच्या ’सर्वसमावेशकता’ या वैश्विक पैलूचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि इतर सर्व धर्मांना वैश्विकतेचे मार्गदर्शन करण्यासाठी ते परिषदेला उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात कधीही श्रीरामकृष्ण परमहंसांच्या किंवा इतर कोणत्याही ऋषींच्या नावाचा उल्लेख केला नाही, तरीही ‘सर्वधर्म परिषदे’त, ते जे काही बोलले, ते श्रीरामकृष्णांची आणि सर्व ऋषींची शिकवणच होती!“ आपल्या एका पत्रात स्वामी विवेकानंद लिहितात की, “पण एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे. महान ऋषीमुनी त्यांच्या नावासाठी नव्हे, तर जगासाठी विशेष संदेश घेऊन येतात. परंतु, त्यांचेच अनुयायी त्यांची शिकवण झुगारून देतात आणि त्यांच्या नावावर भांडणे करतात. जगाचा इतिहास हा असाच आहे. लोक त्यांचे नाव स्वीकारतात की नाही, याचा मी विचार करीत नाही. परंतु, त्यांची शिकवण, त्यांचे जीवन आणि त्यांचा संदेश जगभर पसरविण्यासाठी माझे प्राण पणाला लावण्यास तयार आहे.“
अशा प्रकारे जर कोणी ईश्वराचे विशिष्ट नाव आणि रूप हेच एकमेव खरे नाव आणि एकमेव खरे रूप आहे, असा आग्रह धरला, तर त्यातून संघर्ष निर्माण होईल. विशिष्ट नावाचा आणि रुपाचा आग्रह विभाजन घडवून आणतो. जर आपण केवळ संदेशावर भर दिला, तर बंधुत्व शक्य आहे. कारण, जिथे अनुभूती आहे. तिथे सर्वसमावेशकता आहे आणि म्हणूनच वैश्विक दृष्टिकोन आहे. खर्या अर्थाने आध्यात्मिक व्यक्ती ही सर्वसमावेशकच असायला हवी. जर कोणी आपण आध्यात्मिक असल्याचे सिद्ध करू पाहत असेल; पण त्याचा धार्मिक दृष्टिकोन इतरांशी मिळून मिसळून वागण्याची इच्छा नसणारा असेल, तर त्याचा अध्यात्माचा दावा खोटा आहे!
भारताचे पुनरुत्थान होण्यासाठी आणि ते झाल्यावर जास्तीत जास्त भारतीयांना स्वतःमध्ये आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या आत्म्याची जाणीव रुजवावी लागेल. ध्यान करताना आपण अंतर्मनात आणखी खोल जातो. तेव्हा आपण त्याच्याशी, आपल्या मूळ अस्तित्वाशी एकरूप होत जातो. असे झाल्याने बंधुत्वाचा पाया आणखी पक्का होतो. बाहेरून विचारांची स्पष्टता आणि आपल्या अंतरंगात रुजलेली, शुद्र अहंकारापासून मुक्त करणारी आत्मस्वरुपाची जाणीव या दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणे. हाच ‘विश्वबंधुत्व दिन’ साजरा करण्यामागचा खरा उद्देश आहे!
संजय पाठक
(लेखक विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आहेत.)