रेती तस्करीची तक्रार करा थेट व्हॉटसअपवर

01 Sep 2023 19:58:01

reti


ठाणे, दि.०१ :
 पर्यावरणाचा ऱ्हास वाढल्याने जिल्हा प्रशासनाने रेती उत्खननास बंदी केली असतानाही ठाणे जिल्ह्यात खाडीत रेती माफियांद्वारे मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरु आहे. रेती माफियाच्या या वाढलेल्या कारवायां रोखण्याकामी नागरीकांना तक्रारी करण्यासाठी दोन व्हॉटसअप हेल्पलाईन क्रमांक कार्यरत करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्हाधिकाऱ्याच्या अखत्यारीत कार्यरत असलेले रेतीगट दक्षता पथक क्र. ०१ व ०२ यांच्या मार्फत हे हेल्पलाईन क्रमांक कार्यरत करण्यात आले आहेत.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळल्यास नागरिकांनी या व्हॉटसअप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांनी केले आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळून आल्यास वरील क्रमांकावर माहिती पाठवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

असे आहेत व्हॉटसअप क्रमांक :
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक - संजय जाधव (दक्षता पथक क्र. ०१) - ९३२४९७८०२०, सचिन भोईर (दक्षता पथक क्र. ०२) - ७०३०६७३६८८.



Powered By Sangraha 9.0