नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात काश्मीरी हिंदुवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या वेब मालिकेतून ज्या घटना समोर आल्या नाहीत त्या पीडीतांच्याच तोंडून दाखवण्याचा मानस विवेक अग्निहोत्री यांचा आहे. दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी सरन्यायाधीश चंद्रचुड यांना ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या माहितीपटाच्या आधारे काश्मिरी हिंदुचा नरसंहाराचा खटला उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रचूड यांच्याकडे ही मागणी करत सुप्रीम कोर्टाने पुरव्यांअभावी कोणतीही कारवाई न केल्याचे म्हटले होते. यावर अग्निहोत्री म्हणाले की, “सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी निवृत्त होण्याआधी धर्माचे चांगले काम करावे. काश्मीरमध्ये ३२ वर्षांपुर्वी हिंदुचा नरसंहार झाला होता. यावर सुप्रीम कोर्टाने पुरावे नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे चंद्रचुड यांनी द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड ही वेब मालिका पाहावी, ज्यात त्यांना सुओ मोटो दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे निश्चित मिळतील. जे काम भारत सरकारने आणि कोर्टाने करणे अपेक्षित होते ते आम्ही केले आहे. आणि या नरसंहाराला बळी पडलेल्या पीडितांनीच याबद्दल माहिती दिली आहे आणि ती आम्ही जतन केली आहे.” त्यामुळे आता सरन्यायाधीश चंद्रचुड यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये काश्मिरी हिंदु पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी महत्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या.