मुंबई : गुलामीपूर्वी एक विकसित आणि समृद्ध भारत देश आपण पाहिलेला आहे. चोल, यादव राजांच्या काळात कशाप्रकारे एक विकसित भारत होता आणि त्याच विकसित भारताची संकल्पना आणि ती विरासत आपल्याला लक्षात ठेवायची आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाच्या मुख्य सोहळ्यावेळी म्हटले आहे.
संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. बुधवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री छगन भुजबळ, आमदार मनीषा कायंदे, आमदार सदा सरवणकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध कामांचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी “स्वराज्य आणि स्वातंत्र्याची हाक महाराष्ट्राच्या मातीतून उभी राहिली. याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. स्वातंत्र्याची हाक दिल्यानंतर महिला, मुले, गरीब-श्रीमंत, कामगार, शेतकरी या सर्वांनी आपापल्या परीने स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान दिले. त्यांच्या बलिदानाचे नुसते स्मरण करून चालणार नाही तर त्यांनी देशाप्रती समर्पणाचा संदेश देशभर पोहोचवला पाहिजे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ ची संकल्पना मांडली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
तर माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक ग्रामग्रामातून माती एकत्र करून दिल्लीत ज्यावेळी सर्व शहिदांकरिता वन तयार होईल आणि वनामध्ये अखिल भारताची माती ही त्या ठिकाणी एकत्रित येईल त्यावेळी खऱ्या अर्थाने भारताची ताकद आणि क्षमता ही आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आजादी का अमृतमहोत्सव या अभियानाची सांगता जरी होत असली तरी आपल्या मनात निर्माण झालेली देशभक्तीची ज्योत नेहमी पेटत राहील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.