मदनदासजी : एक ऋजू व्यक्तिमत्त्व

07 Aug 2023 16:28:13
Article On Madandas Devi Written By Prakash Gadgil

साधारण १९८०-८१ची घटना असेल. त्यावेळी मी अभाविप मनमाड शाखेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. मनमाड म्हणजे त्यावेळी एक मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन... आपल्या अनेक ज्येष्ठ पदाधिकारी वर्गाचा नियमित प्रवास आणि मनमाड येथे रेल्वे बदलणे अथवा प्रवासात त्यांना चहा, न्याहारीच्या निमित्ताने भेटीला जाणे हे अगदी नियमितपणे होत असे. रा. स्व. संघाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकार्‍यांच्या लिखाणातूनदेखील असा मनमाडचा उल्लेख आलेला आहेच.
 
अशाच एका प्रवासात तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या उपस्थितीत सायंकाळची प्रार्थना ही मनमाड स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर झाली. तेव्हा, मदनदासजीही असेच प्रवासात मनमाडहून रेल्वे बदलून संभाजीनगर येथे जाण्यासाठी मुंबईवरून आले. तेव्हा, थेट रेल्वेची सोय झालेली नव्हती. त्यामुळे मनमाड येथे मुक्काम करून पुढे जायचे होते. मुक्काम माझ्याच घरी होता. कारण, त्यावेळी घर स्टेशनच्या अगदी जवळ होते. ‘अभाविपचे त्रिमूर्ती’ म्हणून ओळखले जाणारे तीन मोठे कार्यकर्ते खरं तर त्यावेळी माझ्या घरी आले. ‘देवी’ आडनावावरून मी अंदाज ंबांधला की, ते हिंदी भाषिक असावेत. म्हणून मी हिंदी बोलू लागलो, तर त्यांनीच पुढाकार घेतला आणि मराठीतून बाळासाहेब आपटे आणि अशोकराव मोडक आणि स्वतःचा परिचय करून दिला. मग चहा होईपर्यंत तिघांनीही घरातील एखाद्या ज्येष्ठ माणसाने जशी सर्व विचारपूस करावी, तशी संघ आणि अभाविपच्या कामाची चौकशी केली.

वास्तविक, त्यावेळी आम्ही तीन-चार माध्यमिक शिक्षकच विद्यार्थी परिषदेचे काम करीत असू. पण, अशावेळी मुद्दाम म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी संपर्क, गावात अशा विद्यार्थ्यांचे मेळावे कसे घेता येतील, यासंबंधी व्यवस्थित मार्गदर्शन त्यावेळी केले. त्यातून त्यांची कार्यवाढीसाठीची तळमळ आणि या कार्याची आवश्यकता किती महत्त्वाची आहे, हे लक्षात आले. मनमाडचे संघकार्य म्हणजे बाबा थत्ते आणि मधु वावीकर यांची नावे अपरिहार्यच. पण, जेव्हा मदनदासजींनी “इथे प्रभाकर थत्ते राहतात का?” असे विचारले, तेव्हा मी अगदी तत्परतेने “हो...हो आहेत ना” असे उत्तर दिले आणि सकाळी भेटू असे म्हणालो. सकाळी बाबा थत्ते यांच्या घरी गेलो, तर पाहताक्षणी दोघांनी एकमेकाला घट्ट मिठीच मारली. आम्ही तिघे (मोडक, आपटे सर आणि मी) बघतच राहिलो. मग बाबा थत्ते म्हणाले की, “आम्ही दोघे संघ शिक्षा वर्गात एका गणात होतो व अनेक दिवसांनी भेटत आहोत.” तेव्हा असे हे मदनदासजी त्या घरात अगदी सहजतेने थत्ते काकूंसोबत गप्पा मारत बसले.
 
तेव्हा, एखाद्या खटल्याच्या घरातील दीर-वहिनी कसे असतात, याचे रूपच बघावयास मिळाले. अर्थात, ते तिघेही आमच्या दोन्ही घरात अत्यंत कमी वेळात घरच्यासारखेच राहिले. माझी आई आणि पत्नीदेखील त्यांच्या अल्पकालीन सहवासाने हरखून गेल्या होत्या, हे वेगळे सांगायला नकोच. असे हे घडीचे प्रवासी त्यांच्या रेल्वेची वेळ झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघून गेले. परंतु, आम्हाला कार्यवाढीसाठी जी प्रेरणा आणि स्फूर्ती देऊन गेले, त्याचा आजदेखील कार्य करत असताना निश्चितच उपयोग होतो आहे. असे अत्यंत साधे, पण कर्मयोगी जीवन जगणार्‍या मदनदासजींच्या नावापुढे ‘कै’ लावणे खरंच खूप अवघड जात आहे. शेवटी परमेश्वराची इच्छा असते दुसरे काय, भावपूर्ण श्रद्धांजली...

प्रकाश गाडगीळ
९७६३४२३२०३


Powered By Sangraha 9.0