नवी दिल्ली : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी यांच्यात अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू असून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असतानाच हिंसाचार पुन्हा एकदा भडकला. दि. ५ ऑगस्ट रोजी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लांगोल गेम्स गावात समाजकंटकांनी १५ घरे जाळल्यानंतर हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तसेच गोळी लागल्याने एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात याआधी झालेल्या हिंसाचारात मैतेई समुदायातील किमान तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागातील एका गावात हल्लेखोरांनी हल्ला करून पिता-पुत्रासह तिघांची हत्या केली. तसेच, या हिंसाचारात १५ घरांना आग लावण्यात आली असून यात ६ जणांचा मृत्यु झाला आहे.
दरम्यान, मणिपूर हिंसाचाराप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला असून 'आसाम रायफल्स' आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे यात पाहायला मिळत आहे. तसेच, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमधील वादाचा हा व्हिडिओ बिष्णुपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संरक्षण अधिकारी म्हणतात, “संयुक्त मुख्यालयाने जारी केलेल्या आदेशांचे पालन करून, वाहने बफर झोनमध्ये उभी करण्यात आली होती. प्रोटोकॉलनुसार, बफर झोनवर कठोर कारवाई सुनिश्चित करणे आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही समुदायाच्या सदस्यांना एकमेकांकडे जाण्यापासून रोखणे हे केंद्रीय दलांचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.