ब्रेकींग न्यूज : राज्यात मोठ्या मेगाभरतीला सुरुवात, जाहिरात प्रसिद्ध

05 Aug 2023 17:08:18

girish mahajan


मुंबई :
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील पदांबाबत महत्वाची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. ते म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध‌्ये ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची १०० टक्के व इतर विभागांची ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 
त्यानुसार ५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९४६० इतकी पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे गिरीष महाजन यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मार्च, २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे ही परीक्षा होऊ शकली नाही.
 
परंतू आता ५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे.

Powered By Sangraha 9.0