नवी दिल्ली : कांदा आणि टोमॅटोच्या वाढत्या दरांवर अंकुश लावण्याकरिता केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून बफर स्टॉक खरेदी करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकार देशातील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांकडून कांदा आणि टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. परंतु. हवामानाचा फटका खरीप हंगामाला बसला असून या दोन्ही पिकांचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात झाल्याने मागणी वाढून किंमतीदेखील वधारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या वाढत्या भाववाढीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारकडून बफर स्टॉक खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, कांदा आणि टोमॅटो यांच्या भाववाढीत तब्बल १० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, एपीएमसीत कांद्याचा दर प्रति क्विंटल २,०६८ रुपये इतका असून जुलै महिन्याच्या तुलनेत ४.८६ टकक्यांनी वाढ झाली आहे, असे उपभोक्ता मामले विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. सरकारने यावर्षी बफर स्टॉकसाठी ३ दशलक्ष टनांवर २० टक्क्यांहून अधिक कांदा खरेदी केला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.