मनोहारी रानभूल...

05 Aug 2023 21:45:19
Article On Nisarg Kavi N D Mahanor

बाई श्रावणाचं उन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना गं!
निळ्या डोळ्यांवरी, मेघुटांच्यापरी
श्रावणाच्या सरी, पानभर थरथरी
वाट पाहिली, डोळा चळ थांबेना...
श्रावणसरी नुकत्याच कुठे सुरू झाल्या आणि शब्दवेल्हाळ लखलखती ‘रानकविता’ हरपली. श्रावणमास हा कवींचा लाडका ऋतूच. महानोरांची श्रावणकविता यानिमित्ताने प्रकर्षाने आठवते. त्यांच्या कवितांचे रसग्रहण, चिंतन करावे लागत नाही. वाचता वाचताच, ती कविता आपली होऊन जाते. पावसाचा आवेग वाहून गेलेला असतो, अवघी सृष्टी मोहावल्यासारखी नव्हेली होते. ऊन-पाऊस लपाछपी खेळतात, तेव्हा नुकती सर बरसून गेल्यावर आलेलं कोवळं ऊन त्यांना सहन होत नाही का? तर हे निसर्ग माधुर्य पाहून त्यावर भाळून गेलेले रंगी-बहुरंगी पक्षी आपल्याच धुुंदीत विहार करत असतात. त्याच्या पिवळ्याजर्द रंगाकडे सौंदर्यासक्त नजरेने व्याकुळ होऊन पाहणार्‍या नामदेवांना मात्र हा मोहोर असह्य होतो. त्याचे डोळे, त्यावरचा मेघसावळा रंग याचं कौतुक करत असतानाच त्यांच्या मनाचा वेध घ्यावा वाटतो. कविता अशीच असते. फसवी! कुणी सोनपिवळ्या कांतीची नवथर श्रावणी निळ्या डोळ्यांची, दाट काळ्या भुवयांची चंचल यौवना, तर त्यांच्या चळणार्‍या डोळ्यात सलत नसावी? हो! लावणीच आहे ही! स्त्री सौंदर्य अधोरेखित करणार्‍या महानोरांच्या अनेक कविता आहेत.

या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस की
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा,
आणि या पांदीत तुला लुबाडावं
अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
थांबू नकोस!
‘जांभूळ’ या एका शब्दात त्यांचं सारं कवित्व रंगलंय. ’जांभूळ पिकल्या झाडाखाली’ असो की, ’गडद जांभळी’ असो, या रंगापेक्षा शब्दाचीच भूल त्यांना पडलीये. तिला पाहताच असा मोह व्हावा की, उभ्या जागी पार लुबाडून घ्यावं तिचं सर्वस्व! मोहावणं ही स्वाभाविक, नैसर्गिक भावना आणि ही कविता म्हणजे तिची निखळ अभिव्यक्ती. यातली पांदी म्हणजे काय? तर पाणंद. दोन घरांच्या मधून, दोन शेतांच्या बांधातून, जंगलातून चालत येणारी निमुळती वाट म्हणजे पांदी. सांजावताना सावल्या लांब होतात, तेव्हा ती कुणी जांभूळ लुगडं ल्यायलेली स्त्री जसजशी जवळ येते, तसतसा अंधार निळसर गुलाबी छटा बदलत जांभूळवाणा होतो. गडद होतो. गो. नि दांडेकरांचं लेखन आणि स्मिता पाटीलचा अभिनय असं दुहेरी वैशिष्ट्य लाभलेला चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत.’ यातला तिसरा अधोरेखित होणारा स्वर, तो ढोलकीच्या ठेक्यावरच्या गीतांचा.
गीतं लिहिलीयेत महानोरांनी-

असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
आपल्या भावनांना आणि आयुष्यालाही जेव्हा आपण चार भिंतींच्या कोंदणात दडवतो, तेव्हा सगळं कसं गुप्त होऊन जातं. कोंडून ठेवतो का आपण स्वतःला? की संरक्षण असतं ते? सौंदर्याला कलंकाची नेहमीच भीती असते. कर्नाळ्यातल्या ठाकरवाडीची ही कथा. सुळका म्हणजे महादेव तर त्याखालची माशांची पोळं म्हणजे शंकराच्या गळ्यातल्या माळा अशी समजूत असलेल्या ठाकरांची ही गोष्ट. त्यांच्या नीती, त्यांची मूल्य आणि त्यांचे समज... केवळ स्त्री-पुरुष परस्पर संबंधांवर भाष्य करणारी ही कविता नाही, तर यातून तत्कालीन त्या ज्ञातीतील सामाजिक परिस्थिती अधोरेखित होते. स्त्रीचा कणखरपणा दिसून येतो. तिचा निरागस स्वभाव आणि आभाळाइतकं दुःख हे पेलणारा चिंधुला जीव यातून दिसतो. चित्रपटात हे गीत उरुसावेळचं आहे. पण, एकंदर कथानक पाहता चित्रपटाचं सारच त्यात उतरलंय.

विचार, आकर्षण, श्रद्धा/विश्वास, नातं आणि मूल्ये या पंचत्त्वांवर हा चित्रपट आधारलेला आहे. जीत हा वेगळाच भाग. यातून प्रतीत होणारे सर्वच सामाजिक, आर्थिक, मानसिक पैलू उत्तमरित्या यातून गुंफले गेले आहेत. त्यांच्या कवितेचा बाजच वेगळा. शिक्षणात त्यांचं मन रमलं नाही आणि ते पळसखेडला निघून आले. शेतीमातीत रुळले. त्यांच्या निसर्गकविता आज मराठी मनावर अधिराज्य गाजवतात. दुःख क्षणिक असतं. त्याला साहित्यमूल्य नसतं. परिस्थितीशी केलेला द्रोह असतो तो. त्यांनी केवळ निसर्गकविता केल्या नाहीत, तर दुष्काळी गावाच्या व्यथा पाहून त्यासाठी कार्यही केले. ठिबक सिंचनाच्या वापरासाठी लोकांना परावृत्त केलं. आपण ज्या ठिकाणी जन्मलो, तिथली परिस्थिती आयुष्यभर आपल्या जीवनातून मांडत असतो. तिथल्या निसर्गाचं, भोवतालाचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटत असतं.

कित्येक वर्षांची मूर्त परंपरा असलेला अबोल अजिंठा त्यांनी बोलका केला. ‘पळसखेडची गाणी’ ही लोकगीते लिहिली. कथा, व्यक्तिचित्र, सर्वच आजमावून पाहिलं. केवळ लेखणी चालवली नाही, तिला कृतीचा आवाज दिला. त्यांच्या कृतिशील ‘रानवाणी’ने शहर जागं केलं. त्यांच्यातलं जागृत समाजभान शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठीही व्याकुळ झालं. काहीकाळ विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या आईने एकदा त्यांची कवितेची वही जाळून टाकली होती. कलांची आणि पर्यायाने भावनांची अभिव्यक्ती नेहमीच आपल्या आर्थिकवृद्धीच्या आड आली आहे. आज ती स्थिती राहिली नाही आणि म्हणून कदाचित कलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतोय. ज्या माध्यमाद्वारे (भाषेत) उत्तम आशयनिर्मिती/मजकूरनिर्मिती होते, ती भाषा मनामनांवर राज्य करते. परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती तिच्यात असते. कित्येक काळ ठसठसत राहिलेल्या ‘वादळी भावना’ या गोंडस शब्दाआडून धुमसत असतात. अगदी व्याकुळल्या जीवाची कहाणी आहे ही.

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा
निसर्गातील रूपकांना भावभावनांचे अर्थ आपण नेहमीच देत आलो, राघू म्हणजे प्रियकर, तशी मैना किंवा साळुंकी म्हणजे सहचारिणी. तिच जेव्हा आपल्याशी बोलत नाही, तेव्हा एकुलत्या जीवाचं गोड गार्‍हाणं ते गातात. शेवटी आशयनिर्मिती म्हणजे काय? आपल्या भोवताली घडत असलेल्या घटना, गोष्टी, त्यांचे अर्थ शोधून एका वेगळ्या फॉर्ममधून आणि स्वतंत्र परिप्रेक्ष्यातून मांडणे. महानोरांना याच रानावनांची, शेतीमातीची, पाऊसवार्‍याची ‘रानभूल’ पडली होती. ती त्यांनी जगवली. आयुष्यभर...आणि पुरून उरेल एवढं दान भविष्याच्या पदरात टाकलं. आपल्यासाठी...


Powered By Sangraha 9.0