ठाणे : ठाणे तहसील कार्यालयाच्या वतीने समाजात वंचित असलेल्या ठाणे तालुक्यातील ४५ तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. महसूल सप्ताहाअंतर्गत आयोजित एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत तृतीयपंथीय नागरिकांना निवृत्ती वेतनाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
महसूल सप्ताहाअंतर्गत आज ठाणे तहसील कार्यालयाच्यावतीने नानजीभाई खिमजीभाई ठक्कर कॉलेजमध्ये "एक हात मदतीचा" हा कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी विकास गजरे,तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी समाजातून वंचित असलेल्या ठाणे तालुक्यातील तृतीयपंथींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानुसार ०१ ऑगस्टपासून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता संजय गांधी निराधार पेन्शन दरमहा जमा होणार आहे. यापुढील काळात देखील तृतीयपंथी नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी म्हणून संजय गांधी योजनेसह महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
तृतीयपंथीय नागरिकांना समाज वेगळ्या नजरेने बघतो, अशा लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाचा सर्व योजनांचा लाभ देण्याची योजना आखलेली आहे. अशा लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे तहसीलदार बांगर व नायब तहसीलदार पैठणकर यांनी सांगितले.