नवी दिल्ली : नूह हिंसाचाराप्रकरणी खट्टर सरकार अॅक्शनमोडमध्ये आले असून या हिंसाचारामध्ये सहभागी असणाऱ्या रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या २५० झोपड्यांवर बुलडोझर फिरविण्यात आला आहे. ही यासंदर्भात झालेली मोठी कारवाईच म्हणावी लागेल. दरम्यान, सरकारकडून यासंदर्भात स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून याटीमची ३ स्वतंत्र दले तयार करण्यात आली आहेत. यामार्फत झालेल्या तपासातून ही हिंसा पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, या हिंसेंचे राज्यभर पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर सरकारकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच, नूह येथे झालेल्या हिंसाचारसंबंधित तब्बल १५००हून अधिक व्हिडीओ पोलीसांच्या हाती लागले असून यांच्याद्वारे तपासकार्य सुरु आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात अफवा पसरविण्यात आली ज्यामुळे हिंसाचारसदृश्य परिस्थिती मेवातमध्ये निर्माण झाली. तसेच, या कारवाईकरिता रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले होते.
तसेच, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नूह येथील मुस्लिमांना त्यांच्या घरीच नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे. नूहचे जिल्हाधिकारी प्रशांत पनवार आणि पोलीस अधीक्षक यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे उलेमांना सांगितले. यासोबतच गुरुग्राम आणि इतर भागात उघड्यावर नमाज अदा करू नये असे सांगण्यात आले आहे.