मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ८० कोटींच्या पुढचा पल्ला गाठला. गेले दोन महिने ‘बाईपण भारी देवा’ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली असून यात त्यांनी सर्व रसिकप्रेक्षकांचे व टीमचे आभार मानले आहेत.
काय आहे केदार शिंदेंची पोस्ट?
“काल बाईपण भारी देवा सिनेमा प्रदर्शित होऊन २ महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत खूप काही मिळालं. तुम्हा रसिकांच्या मनात घर करता आलं यापेक्षा अहो भाग्य ते काय दुसरं? या सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि त्यानंतर चित्रपटगृह तुडुंब भरून वाहतायत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने घवघवीत यश या सिनेमाला लाभलं. मी या सगळ्याचा एक भाग आहे यापेक्षा आनंद तो काय? अजूनही काही ठिकाणी सिनेमा सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मंगळागौरीचे फेर धरले जातायत. सहा लक्ष्मींच्या साड्या दागिने याचे ट्रेन्ड सर्वत्र दिसून येतायत. श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद मिळाला. पुढे नवं काम करताना जबाबदारीची जाणीव सतत होत रहाणार. चांगलंच देण्याचा प्रयत्न असेल.”