रक्षाबंधनचा ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ला फायदा, अजूनही कमावत आहेत कोटींच्या घरात

31 Aug 2023 13:52:59
 
omg 2 and gadar 2
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने सुगीचा गेला असेच म्हणावे लागेल. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे अभिनेता सनी देओल तर दुसरीकडे अक्षय कुमार. दोन्ही अभिनेत्यांचा चाहता वर्ग हा मोठाच. परंतु यावेळी सनी देओलच्या ‘गदर २’ने बाजी मारली आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ज्यावेळेस प्रदर्शित झाले त्यानंतर मोठा विकेंड असल्यामुळे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यातही गदर २ चित्रपटाला तर प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिला की या चित्रपटाने २० दिवसांच्या प्रदर्शनानंतर ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
 
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ने रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच बुधवारी प्रदर्शनाच्या तिसऱ्या रविवारी १६.१० कोटी रुपयांच्या कमाईनंतर, सोमवार आणि मंगळवारी कलेक्शनमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु बुधवारी ३० ऑगस्टला ८.७५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या गदर २ च्या कलेक्शनची कमाई ४७४.५ कोटी झाली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ६१० कोटींच्याही पुढचा टप्पा गाठला आहे.
 
‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, मोडला ‘केजीएफ २’चा रेकॉर्ड  
 
तर अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर १.७५ कोटींचे कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाची आत्तापर्यंतची एकूण कमाई १४०.१७ कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. दरम्यान, ‘ओएमजी’ हा २०१२ साली आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल असून त्यात अभिनेता परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. तर ‘ओएमजी २’ चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि अभिनेत्री यामी गौतम यांची प्रमुख भूमिका होती. तर दुसरीकडे अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गदर : एक प्रेम कथा’ हा २००१ साली आलेल्या चित्रपटाच्या पुढचा भाग ‘गदर २’ असून लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0