वेदांविषयी अनेक शंका आणि आक्षेप उपस्थित केले जात असतानाच संस्कृत आणि संस्कृती याच्या प्रेमामधून वेदांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत डॉ. सुचेता परांजपे यांच्याविषयी...
डॉ. सुचेता परांजपे या मूळच्या पुण्याच्याच. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्या मुंबईमध्ये कुटुंबासह दाखल झाल्या. त्याचं शालेय शिक्षण मुंबईत आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. अकरावीनंतर त्यांनी संस्कृत शिकायचं, असं मनाशी ठरवलं. त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षिका विजया जोशी यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्यासारख्या काही शिक्षकांकडून संस्कृत विषयाचं त्यांचं प्रेम जागरूक झालं. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. वास्तविक त्या अकरावीमध्ये मेरिटमध्ये आलेल्या होत्या. त्यांना दोन सुवर्णपदक होते. विज्ञान शाखेला त्यांना कोणतेही सायास न करता अगदी सहज प्रवेशही मिळाला असता. परंतु, त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करायचे, असे मनोमन ठरवले. महाविद्यालयामध्ये संस्कृतचे शिक्षण घेत असताना डॉ. धडपडे यांनी त्यांना ऋग्वेद शिकवला. तेव्हापासून वेदांचा अभ्यास करण्याची लालसा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.
डॉ. परांजपे यांनी ‘वेदिक स्टडीज’ हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘एमए’ झाल्यानंतर त्यांनी लगेचच या विषयामध्ये ‘पीएचडी’ करायचे ठरवले. त्यांनी ‘पीएचडी’ला प्रवेशदेखील घेतला. त्याकरिता त्यांना ‘युजीसी’ची फेलोशिप मिळाली. दरम्यान, त्यांचा विवाह झाला. याच काळामध्ये त्यांना दोन जुळी मुले झाली. सांसारिक जबाबदार्या पेलत असतानाच त्यांचा निम्मा प्रबंध लिहून झालेला होता. परंतु, कौटुंबिक जबाबदार्या वाढल्यामुळे त्यांच्या या प्रबंधामध्ये खंड पडला. संस्कृतचा अभ्यास आणि वेदांविषयीचे प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे काही वर्षांनी त्यांनी पुन्हा या विषयावर काम करायला सुरुवात केली आणि हा प्रबंध पूर्ण केला. त्यांनी पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृत आणि ‘इंडोलॉजी’ या दोन विषयांच्या प्राध्यापिका म्हणून प्रभावी काम केले. ‘भांडारकर इन्स्टिट्यूट’च्या ‘महाभारत प्रकल्पां’मध्येदेखील त्यांनी आपले योगदान दिले. ‘एडिशन कल्चरल इंडेक्स’मध्ये त्यांनी काम केले. अमेरिकेतदेखील त्यांनी वेदांविषयी आपला ठसा उमटवला. जर्मनीमध्ये त्यांना चांगली नोकरीदेखील मिळाली होती. परंतु, त्यांना काही कारणास्तव ही नोकरी सोडावी लागली.
वेदांविषयी प्रचार आणि प्रसाराचे काम करीत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली की, वेगवेगळ्या कॉन्फरन्स आणि सेमिनारमध्ये वेदांचा अभ्यास करणारे, संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे, त्याविषयी ज्ञान असणारेच लोक येतात. परंतु, आपण वेद आणि संस्कृत भाषा ही अशा लोकांपर्यंत नेली पाहिजे की, ज्यांना त्याबाबत काहीच माहिती नाही. अनेकदा लोकांना या विषयाची आवड असते. पण, शिकता येत नाही. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी या सर्वसामान्य व्यक्तींसाठी भाषण करणे, लेखन, वक्तृत्व अशा पद्धतीचा वापर करून वेदांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. संस्कृत आणि संस्कृती याविषयीचा लोकांमधलं प्रेम त्यांना या कामात प्रेरणा देऊ लागलं. मग त्या जोमाने याविषयी व्याख्याने देऊ लागल्या. त्यांना भावलेले वेद त्या लोकांपर्यंत तेवढ्याच निष्ठेने पोहोचवत होत्या. “वेद हा आपला वारसा आहे आणि आपण सर्वांनी वेदांकडे पुन्हा एकदा वळायला हवे,” असे त्या कळकळीने सांगतात. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये डॉ. परांजपे यांनी ऑनलाईन वेबिनार्स आयोजित केले. यासोबतच सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेद पोहोचवण्याचे काम डॉ. परांजपे यांनी केले. वास्तविक वेदांविषयीच्या आक्षेपांना कशाप्रकारे उत्तर द्यावे, असे त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, ‘’आपण वेदांचा अभ्यास करत असतानाच आपल्या मनातील अनेक आक्षेप आणि शंका आपोआप दूर व्हायला लागतात. त्यामुळे आपण स्वतः वेद वाचले पाहिजेत, वेद शिकले पाहिजेत.”
पती आणि मुले कायमच सोबत असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. त्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे या कामासाठी बळ मिळाल्याचे त्या सांगतात. वेदांविषयी लिहिलेल्या प्रबंधाचे मुद्रितशोधनदेखील मुलांनी करून दिल्याचे त्या अभिमानाने अधोरेखित करतात. आपल्या या वाटचालीमध्ये आजवर लाभलेल्या गुरूंचा मोठा आशीर्वाद पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मराठी माध्यमातून शिकवले जाते. त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतात. संध्याकाळच्या वर्गालादेखील गर्दी असते. ‘भांडारकर संस्थे’नेदेखील अनेक लोकांना या संबंधात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. विदेशामधील विद्यार्थ्यांना जाऊन शिकवण्यापेक्षा आपल्याच देशातील आपल्या बांधवांना शिकवण्यामध्ये एका साधनेची अनुभूती आणि वेगळाच आनंद असल्याचे, त्या म्हणतात.
आपल्या या कार्याविषयी सांगताना ते आपल्या गुरू आणि शिष्य अशा दोघांच्याही ऋणी असल्याचे म्हणाल्या. गुरू-शिष्य योग अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत. आगामी काळामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत वेद पोहोचवावे, यासाठी त्या आग्रही आहेत. त्या दृष्टीने कामदेखील करत आहेत. त्याकरिता त्या डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑडिओ-व्हिडिओ-व्हिज्युअल माध्यम या सर्व माध्यमांचा वापर करतात. हे माध्यम सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असते. सहजतेने वापरताही येते. त्यामुळे वेद अगदी सोप्या भाषेत त्यांच्यासमोर पोहोचू शकतात. लोकांमध्ये वेदांविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण होते आहे. वेदांविषयी आपुलकी असलेला वर्ग, समाज आणि संस्था वाढत आहेत. त्यावर विचार करत आहेत. भारतीय संस्कृतीच्या या अमूल्य ठेव्याला सुवर्ण दिवस प्राप्त करून देण्याची डॉ. परांजपे यांची यांची इच्छा आहे. त्यांच्या या कामासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा!