नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सोशल मिडीयावर ही माहिती दिली. संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजेच हे अधिवेशन ५ दिवस चालणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे अधिवेशन नवीन संसद भवनात होणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चालले होते. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मणिपूर प्रकरण आणि पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ केला.
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालू शकले नव्हते. त्यामुळे संसदेत महत्वपूर्ण बिल मंजुर होऊ शकली नाहीत. त्यामुळे या विशेष अधिवेशनात सरकार पावसाळी अधिवेशनात मंजुरी न मिळालेल्या बिलांना पुन्हा एकदा संसदेत मांडणार आहे.