चांदोमामाच्या अंगणात खेळतोय प्रज्ञान रोव्हर! इस्त्रोने शेअर केला नवीन व्हिडीओ
31 Aug 2023 16:37:40
मुंबई : गेल्या आठवड्यात चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी प्रक्षेपण झाले. तेव्हापासून प्रज्ञान रोव्हर कामाला लागले आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा आज आठवा दिवस आहे. आज इस्त्रोने पुन्हा एकदा प्रज्ञान रोव्हरचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर सुरक्षितपणे फिरताना दिसत आहे.
इस्त्रोने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात इस्त्रोने म्हटले की, सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हर फिरवण्यात आला आहे. लँडर इमेजर कॅमेऱ्याने हे रोटेशन टिपले आहे. हे बघताना 'चांदोमामाच्या अंगणात एखादे लहान मूल (प्रज्ञान रोव्हर) खेळत आहे आणि आई (लँडर विक्रम) प्रेमाने पाहते आहे,' असे वाटत असल्याचे इस्त्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापुर्वी चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे अस्तित्व असल्याची माहिती दिली होती. तसेच चंद्रावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियमदेखील असल्याची माहिती चांद्रयानाने दिली होती.
चांद्रयान-३ मोहीम १४ दिवसांची आहे. चंद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस प्रकाश असतो. ज्यावेळी चंद्रावर रात्र असते तेव्हा तेथील तापमान १०० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे एवढ्या कमी तापमानात लँडर आणि रोव्हर या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीजनिर्मिती करणे शक्य होणार नाही आणि ते बंद पडतील. त्यामुळे ही मोहिम केवळ १४ दिवसांची आहे.