चांद्रयानानं पाठवला विक्रम लँडरचा पहिला फोटो!

30 Aug 2023 16:29:49

Vikram lander


मुंबई :
भारताचे नाव इतिहासात नोंदवणाऱ्या चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पहिल्यांदाच विक्रम लँडरचा चंद्रावरील फोटो समोर आला आहे. हा फोटो प्रज्ञान रोव्हरने घेतला आहे. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्यामध्ये हा फोटो घेण्यात आला आहे.

 
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ७.३५ वाजता हा फोटो घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये विक्रम लँडर चंद्रावर प्रक्षेपित झालेला दिसत आहे. इस्त्रोने यापूर्वीसुद्धा चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरमधून काढण्यात आलेल्या विक्रम लँडरचा फोटो शेअर केला होता. परंतु, नंतर तो हटवण्यात आला.
 
चांद्रयान-३ मोहिमेत प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरतानाचे अनेक फोटो इस्त्रोने शेअर केले होते. परंतु, आता पहिल्यांदाच विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले आहे तेथील फोटो इस्त्रोने शेअर केले आहेत. या स्थळाला शिवशक्ती पॉईंट असे म्हणतात.
 
दरम्यान, प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यापासून कामाला लागले आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धृवावर असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करत आहे. प्रज्ञान रोव्हरने नुकतेच चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, अॅल्युमिनियम आणि कॅल्शियम असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचे फोटोदेखील पाठवले आहेत.
Powered By Sangraha 9.0