मुंबई : इंडिया आघाडीची उद्या ३१ ऑग. आणि १ सप्टें. रोजी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विविध राज्यातून ६० ते ६५ नेते उपस्थित असणार आहेत. यावरुन आ. अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सवाल केले आहेत. उद्या बनावट गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का? राहुल गांधींची सावरकरांच्या मुद्द्यावरुन कानउघडणी करणार का? या प्रश्नांची उत्तरे ठाकरेंनी द्यावी, अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले, "उद्या मुंबईत इंडिया नामक एक फर्जी आघाडी उद्धव ठाकरेंच्या आमंत्रणावरुन येत आहे. यानिमित्ताने माझे ठाकरेंना प्रश्न आहेत. ज्या राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी तुम्ही त्यांचे पाय धुतल्यानंतर सुद्धा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली व्यक्त करणारं ट्विट कधी केलं नाही. त्यांना घेऊन तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जाणार का? ज्या राहुल गांधींनी कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली, त्या राहुल गांधींची सावरकरांच्या मुद्द्यावरुन कानउघडणी करणार का? कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत. बेळगावच्या आणि सीमावर्ती भागाच्या मराठी लोकांचे प्रश्न उद्या तुम्ही त्यांच्यासमोर उपस्थित करणार का?" असे सवाल अतुल भातखळकरांनी ठाकरेंना केले आहेत.