मुंबई : आपल्या प्रफुल्ल शैलीतील निसर्गकवितांनी महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या पद्मश्री ना. धो. महानोर यांचे दि. ३ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक येथे सकाळी साडेआठच्या दरम्यान त्यांचे देहावसान झाले. किडनीसंबंधी आजाराने ते त्रस्त होते. तसेच प्रकृती अस्थिरतेने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांच्या निधनवार्तेने अवघ्या मराठी मनांवर शोककळा पसरली आहे. कित्येक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहत शोकसंदेश दिला आहे.
निसर्गातील कविता, रानातली गाणी, संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेल्या मनाच्या मनातल्या कविता ते उत्तम करत. 'रानातल्या कविता' हा त्यांचा काव्यसंग्रह उत्तम गाजला. औरंगाबाद येथील पळसखेड हे त्यांचे जन्मगाव. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या रसिक मनाला शहरापेक्षा शेतीचेच ओढ होती. शेतात ते रमत. १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.